सोन्याची झळाळी आणखीनच वाढली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - ""सासूबाईंची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली... मात्र, सहकारनगर पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांतच चोरट्याला पकडून सोनसाखळी हस्तगत केली... पोलिसांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच हे शक्‍य झालं. एकप्रकारे ते सोनं उजळून परत मिळालं... पोलिसांनी आयोजिलेला दागिने परत करण्याचा कार्यक्रम हा आनंद सोहळाच असून, त्या सोन्याची झळाळी आणखीनच वाढली आहे,'' अशी प्रातिनिधिक भावना ऋता कुलकर्णी यांनी व्यक्‍त केली. 

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात बुधवारी मुद्देमाल परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सोनसाखळी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांतील ऐवज पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांच्या हस्ते फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. सहआयुक्‍त रवींद्र कदम, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप देशपांडे, शशिकांत शिंदे, रवींद्र सेनगावकर, साहेबराव पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात 72 गुन्ह्यांतील फिर्यादींना एक किलो 753 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सव्वादोन किलो चांदी, असा 45 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज परत करण्यात आला. 

फिर्यादींच्या वतीने काहीजणांनी प्रातिनिधिक स्वरूपात भावना व्यक्‍त केल्या. या वेळी मयूर कॉलनीतील स्मिता शेवलेकर म्हणाल्या, ""कोथरूड पोलिसांकडून आम्हाला चांगली वागणूक मिळाली. पोलिसांनी परिश्रम घेत दोन तासांत चोरीचे दागिने परत मिळवून देत आम्हाला सुखद धक्‍काच दिला.'' अतिरिक्‍त आयुक्‍त देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. तर, उपायुक्‍त पंकज डहाणे यांनी आभार मानले. 

पोलिसांनी सोन्यासारखं काम केलं 
प्रा. दिलीप सावंत म्हणाले, ""पत्नीची हातातील सोन्याची पाटली चोरीस गेली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, "सकाळ'मध्ये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला अटक केल्याची बातमी वाचली. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली असता, आमचा मुद्देमाल मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुण्याच्या पोलिसांनी सोन्यासारखं काम केलं आहे.'' 

पोलिसांवर विश्‍वास ठेवा : शुक्‍ला 

पोलिस आयुक्‍तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विविध गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. गेल्या वर्षात चोरीस गेलेला चार कोटी रुपयांचा ऐवज तक्रारदारांना परत केला. पोलिस शेवटी माणूसच आहे, त्यांच्याकडूनही चुका होतात. पोलिसांवर विश्‍वास ठेवा, ते तुमच्या रक्षणास तत्पर राहतील, असे रश्‍मी शुक्‍ला यांनी सांगितले. 

Web Title: pune news police