'दोन हजार कोटींच्या मालमत्तेवर टाच'

'दोन हजार कोटींच्या मालमत्तेवर टाच'

पुणे - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या दोन हजार 168 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिली. 

पोलिस आयुक्‍तालयांतर्गत शुक्‍ला यांनी सन 2017 मधील गुन्हेगारीविषयक घडामोडींचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिस मुख्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सह आयुक्‍त रवींद्र कदम, अतिरिक्‍त आयुक्‍त रवींद्र सेनगावकर, प्रदीप देशपांडे, साहेबराव पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

शुक्‍ला म्हणाल्या, ""आर्थिक गुन्हे शाखेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 79 गुन्हे दाखल केले असून 106 जणांना अटक करण्यात आली आहे. मालमत्तेवर टाच आणलेल्यांमध्ये बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या सुमारे अठराशे कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. तसेच, भूखंडांमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या टेम्पल रोझ कंपनीची तीनशे कोटी रुपये, फडणीस प्रापॅर्टीजची 30 कोटी रुपये, हडपसर येथील धनदा कॉर्पोरेशनच्या दहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.'' 

सायबर गुन्ह्यात दुपटीने वाढ 
शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. सन 2017 मध्ये या गुन्ह्यांच्या पाच हजार 741 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 528 अर्ज पोलिस ठाण्यांकडे पाठविण्यात आले. सायबर गुन्हे शाखेने 52 गुन्हे दाखल करून 97 आरोपींना अटक केली. या गुन्ह्यांत सहा कोटी 79 लाख रुपये इतकी रक्‍कमदेखील वसूल केली आहे. स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. दरम्यान, सायबर गुन्हे रोखण्यासाठी विविध संस्था, कंपन्या आणि शाळा-महाविद्यालयांमधून जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी "वुई फाइट सायबर क्राइम' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

पिंपरी- चिंचवड आयुक्‍तालयाचा प्रस्ताव सादर 
पिंपरी- चिंचवड येथे स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या संदर्भात राज्य सरकार योग्य निर्णय घेईल. त्यामुळे याबाबत भाष्य करणे योग्य होणार नाही, असे शुक्‍ला यांनी स्पष्ट केले. 

ऑनलाइन सुरक्षेवर भर 
पुणे पोलिसांनी संकेतस्थळावर वस्तू हरवल्याची तक्रार नोंदविण्यासाठी "लॉस्ट अँड फाउंड आर्टिकल्स' सुरू केले आहे. याअंतर्गत आतापर्यंत 72 हजार 790 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांच्या सुविधेसाठी "टेनंट इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशन' पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात 50 हजारांहून अधिक भाडेकरूंनी यात नोंदणी केली आहे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी "पोलिसकाका' उपक्रम सुरू केला असून, शहरातील एक हजार 220 शाळांमध्ये 213 "पोलिसकाका' नेमले आहेत. यात आत्तापर्यंत 11 तक्रारी दाखल झाल्या आहेत. महिला कर्मचाऱ्यांसाठी पोलिस ठाण्यांच्या पातळीवर 714 "बडीकॉप' व्हॉट्‌सऍप ग्रुप सुरू केले आहेत. यामध्ये 85 हजार 431 महिला आहेत. तसेच, 80 हजार महिलांनी त्यांच्या मोबाईलमध्ये "सिटी सेफ' ऍप डाउनलोड केले आहे. 

पारपत्र पडताळणीच्या प्रक्रियेस गती 
विशेष शाखेकडून पारपत्र पडताळणीसाठी "एम पासपोर्ट' ऍपचा वापर सुरू केल्याने पडताळणीसाठीचा वेळ कमी झाला आहे. नागरिकांनी पोलिस ठाण्यात हजर न राहता घरीच कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळणे शक्‍य झाले आहे. सन 2017 मध्ये 34 परदेशी नागरिकांना "लिव्ह इंडिया'ची नोटीस बजावली आहे. 45 परदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्यात आले असून, 139 परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com