खाकी वर्दीचा रुबाब सामान्यांवर कशाला?

शुक्रवार, 21 जुलै 2017

लक्ष्मी रस्त्यावरील कपड्याचे व्यापारी राजेश गिते कुटुंबासह मुळशी येथून घरी परतत होते. भूगाव येथे वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पोलिसांनी त्यांना अडविले. कोणतीही चूक नसताना त्यांना पोलिस व्हॅनमध्ये डांबून कुटुंबीयांसमोर जबर मारहाण केली. खाकी वर्दीतील अशा काही मुजोर कर्मचाऱ्यांमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. सर्वसामान्यांवर रुबाब दाखविण्याऐवजी गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण केल्यास पोलिसांची प्रतिमा नक्कीच उंचावण्यास मदत होईल.

राजेश गिते हे रविवारी (ता. १६) सायंकाळी कुटुंबासह मोटारीमधून मुळशी येथून वारजे येथील घरी परतत होते. त्यांच्यासमवेत पत्नी आणि पुतणी या दोघी होत्या. भूगाव येथे सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे वाहतूक संथगतीने पुढे सरकत होती. भूगावजवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीच्या पुढे ऑडी गाडी होती. त्याठिकाणी ऑडीमधील व्यक्‍ती आणि एका पोलिस कर्मचाऱ्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू होती. त्या वेळी बाजूला रस्ता मोकळा असल्यामुळे गिते यांनी गाडी पुढे घेतली. त्यावर त्या पोलिस कर्मचाऱ्याने गाडीवर काठी मारून खाली उतरण्यास सांगितले. ‘माझ्या अंगावर गाडी घालतोस का?’ असे म्हणत लायसेन्स मागितले. तेव्हा गिते यांनी ‘माझी कोणतीही चूक नाही. मी व्यापारी माणूस आहे. मी अंगावर गाडी कशाला घालू,’ असे स्पष्टीकरण दिले. त्यावर ‘लायसेन्स उद्या पिरंगुटला येऊन घेऊन जा,’ असे उत्तर त्या पोलिसाकडून मिळाले. तेथील एका पोलिस उपनिरीक्षकाने लायसेन्स काढून घेतले. गिते यांनी पोलिसांसोबत वाद नको म्हणून चलन देण्याची मागणी केली. त्यावर कर्मचाऱ्याने चिडून ‘तुम्हाला मस्ती आहे, मस्ती जिरवलीच पाहिजे,’ असे म्हणत त्यांना पोलिस व्हॅनमध्ये ओढत नेले. व्हॅनचे दार लावून त्यांना जबर मारहाण केली. ‘रक्‍तदाब आणि शुगरचा त्रास आहे, मला मारू नका,’ असे गिते यांनी सांगितले. तेथील दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने त्या उपनिरीक्षकांची माफी मागण्यास सांगितले. त्यावर त्यांनी त्यांची माफीही मागितली. त्या वेळी पत्नी आणि पुतणी यांनीही पोलिसांना मारहाण न करण्याची विनंती केली. पण, त्या पोलिसांनी त्यांचे काही ऐकले नाही. काही वेळाने गिते यांना पोलिस व्हॅनमधून बाहेर काढले. त्यांच्या पत्नी आणि पुतणीलाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या मारहाणीत गिते यांना जबर मार लागला असून, डोळ्याच्या खाली गालाचे हाड मोडले आहे. यानंतर गिते दांपत्याने भीतीपोटी हा प्रकार दोन दिवस कोणाला सांगितला नाही. काही चूक नसताना पोलिसांनी मारहाण केल्याचा मनस्ताप होत असल्याची भावना त्यांच्या पत्नीने व्यक्‍त केली. 

याप्रकरणी गिते कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. काही बोटांवर मोजण्याइतक्‍या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बेताल वागण्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. संबंधित दोषी पोलिस कर्मचाऱ्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे. पोलिस अधीक्षक सुवेझ हक याकडे गांभीर्याने लक्ष घालून गिते कुटुंबीयांना न्याय मिळवून देतील, ही अपेक्षा.

Web Title: pune news police crime