पोलिस उपनिरिक्षकाने सापडलेले 31 हजार केले परत

संदीप जगदाळे
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

धनत्रयोदशी दिवसी मला पाकीट मिळाले. त्यातच दिवाळीचा सण. पाकीट हरविलेल्या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल, हा विचार करून मी व्याकुळ झालो. विकास याचा कोणताही पत्ताअथवा संपर्क क्रमांक नसतानाही आम्हाला त्याला शोध घेण्यात यश आले. तसेच त्याच्या कमाईचे पैसे परत करता आले, याचा मला खूप आनंद आहे, देवाची मी खूप ऋणी आहे.

पुणे : तरूणाचे हरवलेले एकतीस हजार रूपयांनी भरलेले पाकीट पोलिस उपनिरीक्षक गोरखनाथ शिर्के यांना सापडले. त्यानंतर ज्या तरूणाचे पाकीट हरवले आहे, त्याचा शोध घेवून ते पैशांसह प्रामाणिकपणे परत केले. हरवलेले पैसे व पाकीट शिर्के यांनी हातात देताच विकास पांडूरंग काळभोर ( वय. 32, रा. लोणीकाळभोर ) या तरूणाला आनंद आश्रृ अनावर झाले. पोलिसांमधील माणूसकी व प्रामाणिकपणाचा प्रत्यला त्याला आणि हि घटना पाहणा-या प्रत्येकाला आला.

रात्री सात वाजण्याच्यासुमारास काळभोर हे आई-वडिलांचे औषध घेण्यासाठी गांधी चौकातील गणेश मेडिकलमध्ये आले होते. औषध घेवून ते समोरील पूलाखाली आले. तेंव्हा आपले पाकीट खिशात नल्सल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ते मिळून आले नाही. अखेर हताश होवून ते हडपसर पोलिस ठाण्यात पाकीट व पैसे हरविल्या बाबतची तक्रार देण्यासाठी पोहचले.

दरम्यान, गांधी चौकात वाहतूक नियम करत असताना पैशांनी भरलेले पाकीट शिर्के यांना सापडले. मात्र पाकीटात पत्ता अथवा फोन नंबर नव्हता. त्यामुळे हे पाकीट नक्की कोणाचे आहे, याचा त्यांनी शोध सुरू केला. शेवटी पाकीटात काळभोर यांच्या वडिलांचे नाव असलेले जोशी हॅास्पीटलमधील उपचाराचे कार्ड मिळाले. त्यावरून त्यांनी शिवाजीनगर येथील जोशी हॅास्पटलशी संपर्क साधला. कार्डवरील रजिस्टर क्रमांकाच्या अधारे त्यांना पेशंटचे डिटेल्स मिळाले. विकास याचा मोबाईल क्रमांक त्यांनी शिर्के यांना दिला. या क्रमांकावर शिर्के यांनी विकासला संपर्क साधला. तुझे काही हरविले आहे, का अशी विचारपूस केली. तेव्हा माझे पैशाचे पाकीट हरविले असून मी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठीच आलो असल्याचे विकास सांगितले. गांधी चौकात विकास शिर्के यांना भेटला. हे पाकीट विकासचेच आहे, याची खातरजमा शिर्के व त्यांचे सहकारी विशाल भोई यांनी केली. त्यानंतर पाकीटातील 31 हजार 500 रूपये, विविध बॅकांची 4 एटीएम कार्ड, आधार कार्ड आदी मौल्यवान वस्तू परत केल्या. 

शिर्के म्हणाले, धनत्रयोदशी दिवसी मला पाकीट मिळाले. त्यातच दिवाळीचा सण. पाकीट हरविलेल्या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल, हा विचार करून मी व्याकुळ झालो. विकास याचा कोणताही पत्ताअथवा संपर्क क्रमांक नसतानाही आम्हाला त्याला शोध घेण्यात यश आले. तसेच त्याच्या कमाईचे पैसे परत करता आले, याचा मला खूप आनंद आहे, देवाची मी खूप ऋणी आहे.

तर विकास म्हणाला, शिर्के यांच्या रूपाने मला देव भेटला. पोलिसात देखील माणुसकी आणि प्रामाणिकपणा असतो. याचा मला प्रत्यय आला. त्यामुळे पू्र्वीचा पोलिसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आता बदलला. 

Web Title: Pune news police return money