आमिष दाखवणाऱ्या संस्थांवर पोलिसांची नजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पुणे - जादा व्याजदर अथवा पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या वित्तीय संस्थांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अशा प्रकारांना आळा बसावा आणि ठेवीदारांचे संरक्षण व्हावे, यासाठी अशा संस्थांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना राज्य सरकारने पोलिसांना दिल्या आहेत.

पुणे - जादा व्याजदर अथवा पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या वित्तीय संस्थांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अशा प्रकारांना आळा बसावा आणि ठेवीदारांचे संरक्षण व्हावे, यासाठी अशा संस्थांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना राज्य सरकारने पोलिसांना दिल्या आहेत.

पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या वित्तीय संस्थांची माहिती जतन करावी. तसेच कोणतीही संस्था ही ठेवीदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने काम करत असल्यास तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच त्या संस्थांवर लक्ष ठेवण्यास जिल्हा प्रशासनाच्या विशेष शाखेस सूचित करावे, असे या आदेशात नमूद केले आहे.

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार, अशा वित्तीय संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. या पार्श्‍वभूमीवर ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण प्रभावीपणे करण्याच्या हेतूने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांना आता त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अशा वित्तीय संस्थांची माहिती ठेवावी लागणार आहे. तसेच अशा वित्तीय संस्थांच्या वतीने ठेवी स्वीकारण्यासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींवर देखरेख ठेवणे. कोणतीही संस्था ही ठेवीदारांच्या हितसंबंधास हानिकारक ठरेल, अशा रीतीने काम करत असल्याचे निदर्शनास आले, तर त्यांच्याविरुद्ध कायद्याच्या प्रचलित तरतुदीनुसार तत्काळ कार्यवाही करावी लागणार आहे.

अनेक प्रकरणे सरकारकडे
विविध प्रकारची आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. निश्‍चित केलेल्या मुदतीत फायद्यासह ठेव परत करण्याच्या अटीवर अनेक कंपन्या गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारतात. मुळातच अशा प्रकारे अवास्तव व्याज देणे शक्‍य नसते. कालांतराने अवास्तव परतावा देणे शक्‍य नसल्याने गुंतवणूकदारांची फसवणूक करतात. याबाबतची अनेक प्रकरणे सरकारकडे आली आहेत.

Web Title: pune news police watch on organisation