देशात गरिबांची संख्या वाढतेय - पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींना सन्मानित केल्यामुळे इतरांसमोर आदर्श निर्माण होतो. यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जिद्दीने काम करण्याची स्फूर्ती मिळते.
- श्रीनिवास पाटील, राज्यपाल, सिक्कीम

पुणे - ‘आपला देश एकीकडे महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजातील गरीब लोकांची संख्या वाढतच आहे. आजही अनेक जण उपाशीपोटी झोपतात. समाजातील एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत,’’ असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. इस्कॉनच्या मदतीने टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शियमने राबवीत असलेला रोज वीस हजार खिचडी पॅकेट वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे, असेही ते म्हणाले.

टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे (टीएमसी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विमाननगर येथील सिम्बायोसिस एज्युकेशन कॉम्प्लेक्‍सच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी ‘टीएमसी’चे अध्यक्ष बाहरी बी. आर. मल्होत्रा, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सचिव डॉ. जयसिंग पाटील, वेकफील्ड फूड्‌सचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी मल्होत्रा आदी उपस्थित होते.

नोबेल पुरस्कारप्राप्त गुरुत्वीय लहरीच्या संशोधकांच्या टीममधील डॉ. संजीव धुरंधर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप (रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी), ‘आयसर’चे संचालक डॉ. के. एन. गणेश यांना विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी; प्रादेशिक परिवहन अधिकारी बी. आय. आजरी, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, विमानतळ प्राधिकरण संचालक अजयकुमार यांना प्रशासकीय सेवेसाठी; अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत वाकणकर, कोलंबस रुग्णालयाचे सरव्यवस्थापक डॉ. विजूराजन यांना आरोग्य सेवेसाठी गौरविण्यात आले. 

तसेच सुदर्शन जीन्सचे बन्सल सुदर्शन व सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांना उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी; क्रिकेटपटू पूनम राऊतला खेळासाठी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना कलेसाठी, सूर्यदत्ता एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया यांना शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल आणि विधिज्ञ ॲड. चंदन परवानी (कायदा) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘आज का आनंद’चे संपादक शाम अगरवाल आणि नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

Web Title: pune news poor count increase