संरक्षणात स्वयंसिद्धतेसाठी "पीपीपी' महत्त्वाचे - अरुण जेटली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

पुणे - 'भारताला युद्ध साहित्य क्षेत्रातील उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नवी ओळख देण्यासाठी "सार्वजनिक आणि खासगी भागीदारी' (पीपीपी) महत्त्वाची आहे. त्यातून देश संरक्षण क्षेत्रात स्वयंसिद्ध होईल,'' असा विश्‍वास संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला.

पुणे - 'भारताला युद्ध साहित्य क्षेत्रातील उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नवी ओळख देण्यासाठी "सार्वजनिक आणि खासगी भागीदारी' (पीपीपी) महत्त्वाची आहे. त्यातून देश संरक्षण क्षेत्रात स्वयंसिद्ध होईल,'' असा विश्‍वास संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला.

पुण्यातील "डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्‍नॉलॉजी' (डीआयएटी) या अभिमत विद्यापीठाच्या नवव्या पदवी प्रदान समारंभात ते रविवारी बोलत होते. या वेळी 133 विद्यार्थ्यांना जेटली यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास खात्याचे सचिव डॉ. ख्रिस्तोफर आणि कुलगुरू डॉ. सुरेंद्र पाल व्यासपीठावर उपस्थित होते.

जेटली म्हणाले, 'देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंसिद्ध करण्यासाठी संशोधन आणि उत्पादन हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. शस्त्रास्त्र आणि युद्ध साहित्याबाबत दुसऱ्यावर अवलंबून राहून कोणतेही राष्ट्र स्वतःची सुरक्षा दीर्घकाळपर्यंत करू शकत नाही. आर्थिक क्षेत्रात भारत हा आता उत्पादनाचे प्रमुख केंद्र होत आहे. तसेच, देशाच्या सुरक्षेसाठी संरक्षण क्षेत्रातील साहित्य उत्पादनाचेही प्रमुख केंद्र म्हणून पुढे येणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांमधील ज्ञानाचा आणि कुशल मनुष्यबळाचा वापर केला पाहिजे. तंत्रज्ञान निर्माण होईल, असा आपला दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. त्यासाठी युद्ध साहित्यांची निर्मिती आता सार्वजनिक क्षेत्राबरोबर खासगी उद्योगांसाठीही खुले केली आहे. या क्षेत्रात दोघेही समान भागीदार आहेत.''

या वेळी खासगी उद्योगांमार्फत तयार केलेल्या युद्धसाधनांची माहिती जेटली यांना देण्यात आली होती. त्याबाबत ते म्हणाले, 'सार्वजनिक- खासगी भागीदारीतून (पीपीपी) आयुधे उत्पादनातील एक टप्पा आपण गाठला आहे. दहशतवाद आणि सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीविरोधात स्वातंत्र्याला 70 वर्षे झाली, तरीही लढाई सुरूच आहे. आपण जगातील वेगवेगळ्या देशांकडून लढाई लढण्यासाठी युद्धसामग्री घेत आहोत. त्यामुळे देशातील खासगी उद्योगांनी पुढे येऊन संरक्षण साहित्य उत्पादनात सहभाग घ्यावा, असे धोरण सरकारने स्वीकारले आहे.'' प्रास्ताविक डॉ. पाल यांनी केले.

भारतात अद्यापही शेती व त्याच्या संबंधित व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 15 ते 16 टक्के वाटा हा देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50 ते 60 टक्के नागरिकांचा आहे. इतकी मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. उत्पादक देश म्हणून उदयास येण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्‍चित आकार देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्‍यक आहे.
- अरुण जेटली, केंद्रीय संरक्षण आणि अर्थमंत्री

"जीडीपी'त शेतीक्षेत्राचे प्रमाण कमी
आपल्या देशातील शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) शेतीक्षेत्राचे प्रमाण कमी आहे. विकसनशीलतेकडून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशांमध्ये काही समान दुवे अगदी स्पष्ट दिसतात. त्यात वेगाने होणारे शहरीकरण, उंचावत असलेले जीवनमान अशा घटकांचा समावेश होतो. यात बहुतांश ठिकाणी आर्थिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असताना दिसतो, असेही अरुण जेटली यांनी सांगितले.

Web Title: pune news pp important for self defense