मुद्रा योजनेतून रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे - ""मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या भांडवलाच्या जोरावर लाखो तरुण स्वतःचा व्यवसाय उभारत आहेत. त्यामुळे तरुणांनी रोजगार मिळवण्यापेक्षा या योजनेद्वारे रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे,'' असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केले. 

पुणे - ""मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या भांडवलाच्या जोरावर लाखो तरुण स्वतःचा व्यवसाय उभारत आहेत. त्यामुळे तरुणांनी रोजगार मिळवण्यापेक्षा या योजनेद्वारे रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे,'' असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केले. 

राज्यस्तरीय बॅंकर्स समिती, महाराष्ट्र राज्य, तसेच जिल्हा प्रशासन पुणे आयोजित "मुद्रा प्रोत्साहन अभियाना'त बालगंधर्व रंगमंदिर येथे ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महाराष्ट्र बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक रवींद्र मराठे, महापौर मुक्ता टिळक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, "डीएफएस' दिल्लीचे अशोककुमार डोग्रा, "एमएसएलआरएम'च्या मुख्य व्यवस्थापक आर. विमला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दिनेश डोके आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जावडेकर म्हणाले, ""मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार करणे हा मुद्रा योजनेमागचा सरकारचा मुख्य उद्देश आहे. तारण नसल्यामुळे लाभार्थ्याला सहज कर्ज मिळते. कुठलाही व्यवसाय नसताना 4 कोटी तरुणांनी मुद्राच्या साह्याने व्यवसायात उडी घेतली आहे. या योजनेच्या मदतीने सावकाराच्या जाळ्यातून मुक्तता होईल. ही योजना स्वयंरोजगाराचे नवे दालन आहे. "नव्या भारताची नवी आकांक्षा, नवी योजना मुद्रा योजना' अशी घोषणा त्यांनी या वेळी केली. 

या वेळी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना कर्जवाटप करण्यात आले. पंतप्रधान सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. तसेच "मुद्रा' योजनेअंतर्गत तरुणांना कर्जमंजुरी प्रमाणपत्रदेखील देण्यात आले. "मुद्रा यशोगाथा' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी लाभार्थ्यांनी अनुभवकथन केले. 

बॅंकेत हेलपाटे मारायला लावू नका 
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांनी नागरिकांना सहकार्य करावे. आवश्‍यक कागदपत्रांची यादी द्यावी, एका कागदपत्रासाठी पुन्हा पुन्हा हेलपाटे मारायला लावू नयेत. योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घ्यावे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी व्यक्त केले.

Web Title: pune news Prakash Javadekar