जावडेकरसरांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

सरस्वती मंदिर संस्थेच्या रात्रशाळेतील दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार

सरस्वती मंदिर संस्थेच्या रात्रशाळेतील दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार

पुणे - दिवसभर काम करून रात्रशाळेत आल्यावर दमल्यासारखे होत नाही का ?, तुला शिकून काय व्हायचे आहे?... तुम्ही अभ्यास केव्हा करता?.. असे प्रश्‍न विचारत आणि ‘काळजी करू नकोस, आपले पंतप्रधानही चहा विकायचे’ अशा शब्दांत प्रोत्साहन देत दस्तुरखुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर सरांनी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचा तास घेतला. थेट विद्यार्थ्यांमध्ये बसून जावडेकरांनी विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती आणि दररोजची धडपड जाणून घेतली. दिवसा काम करून रात्री शिक्षण घेण्याच्या त्यांच्या जिद्दीला सलाम करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली!  

सरस्वती मंदिर संस्थेच्या रात्रशाळेतील दहावी-बारावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार जावडेकर यांच्या हस्ते शनिवारी झाला. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर, रवींद्र जोशी, प्रसेनजीत फडणवीस, प्रा. अविनाश ताकवले, स्मार्ट पुणे फाउंडेशनचे संदीप बुटाला, रोहित शहा उपस्थित होते. फाउंडेशनने दिलेल्या पुस्तकांचे वाटप जावडेकर यांच्या हस्ते झाले.

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांबाबत आपल्याला कायमच कौतुक असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतानाच त्यांच्या यशाचे रहस्यही त्यांनी व्यासपीठावरच जाणून घेतले. बोलण्यास सांगून भाषण संपल्यानंतर ते थेट खाली बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसले. विविध प्रश्‍न विचारत त्यांनी विद्यार्थ्यांना बोलते केले. विद्यार्थ्यांनीही तितकीच चांगली उत्तरे देत जावडेकर सरांचे मन जिंकून घेतले. काही क्षण जावडेकर विद्यार्थ्यांमध्ये रमून गेले. दरम्यान, प्रास्ताविक आंबेकर यांनी केले.

साध्या शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण
दिवसभर काम करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठीच मी इथे आलो. या विद्यार्थ्यांची स्वप्ने मोठी असतात, त्यामुळे आपल्यालाही उत्साह येतो. जिद्दीने शिक्षण घेणाऱ्यांच्या पाठीशी समाजही खंबीरपणे उभा राहतो. महाग शिक्षण म्हणजे चांगले शिक्षण, हे खरे नाही, या उलट साध्या शाळांमधील शिक्षणही दर्जेदारच असते. रात्रशाळेतील मुलांना ‘डबल’ गुण देण्याची गरज नाही, कारण ते स्वयंप्रकाशित आहेत. आता सगळ्यांनाच जास्त गुण मिळतात. परंतु, खरे गुण पालकांनाही कळले पाहिजेत. गरीब, वंचित व उपेक्षितांना न्याय देण्याचे काम सरकार करत आहे, असे जावडेकर म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news prakash javadekar speech to student