देशभरात "सबको शिक्षा, अच्छी शिक्षा' अभियान - प्रकाश जावडेकर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

पुणे - महाविद्यालयांच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर देशातील शाळांचेदेखील मूल्यांकन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामध्ये ज्या शाळांचा शून्य निकाल कायम असेल त्या शाळा कायमस्वरूपी बंद ठेवण्यात येतील. राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे; परंतु एकाही शाळेचा "शून्य निकाल' लागणार नाही, त्यासाठी "सबको शिक्षा, अच्छी शिक्षा' अभियान राबविणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले.

"माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नन्स'च्या वतीने आयोजित आठव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी राज्यपाल शिवराज पाटील, खासदार दुष्यंत चौटाला, पंडित हरिप्रसाद चौरासिया, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, स्वामी चिदानंद सरस्वती, डॉ. विश्‍वनाथ कराड आणि राहुल कराड आदी उपस्थित होते. या वेळी माजी राज्यपाल पाटील यांच्या हस्ते आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार कर्नाटकचे डी. एच. शंकरमूर्ती यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व संत ज्ञानेश्‍वरांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या वेळी जावडेकर म्हणाले, 'भारतीय लोकशाहीमुळे दैनंदिन जीवनाचे महत्त्वपूर्ण निर्णय जनतेच्या परस्पर सामंजस्य व संवादातून घेतले जातात. तरीदेखील राजकारण म्हणजे वाईट गोष्ट आहे, राजकीय नेते म्हणजे भ्रष्टाचारी, अशी प्रतिमा जनमानसात आहे. राजकारण म्हणजे केवळ लालदिवा होता तोदेखील आम्ही बंद केला आहे. लोकशाहीमुळे लोकसेवेची सर्वांना आणि सर्वोच्च पदांवरही संधी मिळते. दलित कुटुंबातील रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाले, तर रेल्वे स्थानकावर चहा विकणारा मुलगा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाला हे लोकशाहीचे द्योतक आहे. कष्ट, प्रामाणिकता, सचोटी आणि सातत्य ठेवले तर नक्की यश मिळते. राजकारणाला शिव्या देण्यापेक्षा राजकारणात येऊन प्रत्यक्ष काम करून नवा युवा भारत निर्माण करा,'' असेही त्यांनी या वेळी सांगितले.

नवा युवा भारत घडवा
राजकारणाबद्दलचे अज्ञान व गैरसमज दूर करण्यासाठी चांगल्या तरुणांनी राजकारणात करिअर म्हणून यावे. तसेच जातीवादविरहित, दुर्गंधीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त व आतंकवादमुक्त नवा युवा भारत निर्माण करावा, असे आवाहनही प्रकाश जावडेकर यांनी या वेळी केले.

Web Title: pune news prakash javdekar talking