नवनिर्मितीच्या संकल्पनांना प्रोत्साहन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - इलेक्‍ट्रॉनिक जिप्सी, कार्गो स्कूटर, इलेक्‍ट्रिक मोपेड कम्‌ स्कूटर, एवढेच काय, अहो! डिजिटल इंडियात मोबाईल हाच तुमचा ई-मेल होऊ शकतो...अगदी सर्पदंश झाल्यावर चावलेला साप विषारी आहे की बिनविषारी, याचेही निदान अवघ्या तीन मिनिटांत होऊ शकते... अर्थात हे संशोधनाने सिद्ध करून दाखविले आहे नवउद्योजकांनी...या नवनिर्मितीच्या संकल्पना विकसित होऊन सामान्यांना बदलत्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने पुण्यातील सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कने (एसटीपी) पाच उद्योजकांना पन्नास लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर केले आहे. 

पुणे - इलेक्‍ट्रॉनिक जिप्सी, कार्गो स्कूटर, इलेक्‍ट्रिक मोपेड कम्‌ स्कूटर, एवढेच काय, अहो! डिजिटल इंडियात मोबाईल हाच तुमचा ई-मेल होऊ शकतो...अगदी सर्पदंश झाल्यावर चावलेला साप विषारी आहे की बिनविषारी, याचेही निदान अवघ्या तीन मिनिटांत होऊ शकते... अर्थात हे संशोधनाने सिद्ध करून दाखविले आहे नवउद्योजकांनी...या नवनिर्मितीच्या संकल्पना विकसित होऊन सामान्यांना बदलत्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने पुण्यातील सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कने (एसटीपी) पाच उद्योजकांना पन्नास लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर केले आहे. 

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कने उद्योगांकडून नवनिर्मितीसंदर्भातील प्रस्ताव मागविले होते. त्याअंतर्गत पाच कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. "सकाळ'चे अध्यक्ष आणि "एसटीपी' या संस्थेचे आजीव सदस्य प्रतापराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुलाखतीद्वारे या कंपन्यांची निवड करण्यात आली. "एसटीपी'चे महासंचालक व कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे, आजीव सदस्य दिलीप बंड, नचिकेत ठाकूर उपस्थित होते. पिक्‍सी इलेक्‍ट्रिक कार्स प्रा.लि., रिव्होल्टा मोटर्स प्रा.लि., लायकन इलेक्‍ट्रिक प्रा.लि., नुम्बा प्रा.लि, ऑक्‍झोलोटल बायोटेक्‍नॉलॉजीज्‌ प्रा.लि. अशी या कंपन्यांची नावे आहेत. 

नव्या कल्पनांना चालना मिळावी, यासाठी कार्यरत असलेल्या "एसटीपी'च्या ग्रोथ लॅब इन्क्‍युबेटरच्या माध्यमातून उद्योजकांना अर्थसाह्य देण्यात येते. याबाबत प्रतापराव पवार म्हणाले, ""नव उद्योजक तयार व्हावेत. नोकऱ्या शोधण्याऐवजी ज्ञाननिर्मितीतून उद्योजकांच्या कल्पना विकसित व्हाव्यात. समाजातल्या लोकांपर्यंत संशोधन पोचावे. यासाठीच सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कतर्फे संशोधकांच्या मुलाखती घेण्यात येतात. त्यांच्यातील गुणवत्ता तपासून त्यांना अर्थसाह्य करण्यात येते. जागतिक पद्धतीची नवनिर्मिती घडावी, यासाठी उद्योजकांना मदत देण्यात येते.'' 

दिलीप बंड म्हणाले, ""इलेक्‍ट्रिकचे युग आले आहे. 2020 नंतर गाड्याही इलेक्‍ट्रिकवरच्या पाहायला मिळतील. आजमितीला भारतात एकशे दहा कोटी मोबाईलधारक आहेत, तर दहा कोटी जनतेकडेच ई-मेल आहे. नुम्बा या कंपनीने मोबाईल हाच ई-मेल असे सॉफ्टवेअर डेव्हलप केले आहे. यासारख्या नव्या कल्पनांतून उद्योजक घडतील.'' डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले, ""प्रगतीची प्रयोगशाळा अर्थातच ग्रोथ लॅबद्वारे यापूर्वी काही कंपन्यांना अर्थसाह्य दिले. केंद्र सरकारने साडेचार कोटींचा निधी दिला आहे. उद्योजकांना याद्वारे मार्गदर्शनही देण्यात येते.'' 

उद्योजकांना योजनेचा लाभ 
कल्पना आहेत. मात्र अर्थसाह्य नाही, अशा उद्योजकांना ग्रोथ लॅबच्या माध्यमातून सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क, पुणे अर्थसाह्य करते. मार्केटिंग, बिझनेस प्लॅन्स, तज्ज्ञांचे मार्गदर्शनही उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योजकांच्या कल्पनांना निश्‍चितच किंमत निर्माण होऊ शकते. स्टार्ट अप, हायटेक उद्योजकांना या माध्यमातून दहा लाख रुपयांचे अनुदान आणि चाळीस लाख रुपये कर्जस्वरूपात देण्यात येतात. त्यामुळे उद्योजकांनीही या योजनेचा लाभ घ्यायला हवा. 

""जिप्सी कार इलेक्‍ट्रॉनिक कारमध्ये कर्न्व्हर्ट करण्याचा आमचा प्रकल्प आहे. इलेक्‍ट्रिक व्हेईकलमुळे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होते. पेट्रोलचा खर्चही वाचतो. अशा गाड्या वन-पर्यटनासाठीही उपयुक्त ठरू शकतात.'' 
राजीव रणदिवे. प्रमोटर, पिक्‍सी इलेक्‍ट्रिक कार्स प्रा.लि.

""पिझ्झा, कुरिअर, फ्लिप कार्डची डिलिव्हरी स्कूटरवरून होताना दिसते. मात्र सुरक्षित दृष्टिकोनातून आम्ही कार्गो स्कूटरची निर्मिती करीत आहोत. लवकरच ही स्कूटर आम्ही लॉंच करणार आहोत.'' 
विजय प्रवीण. संचालक, रिव्होल्टा मोटर्स प्रा.लि.

""मोपेड कम्‌ स्कूटर भारतात तसेच परदेशातही लॉंच करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वय वर्षे बारापासून ते साठ वर्षे वयोगटातील लोकांना निश्‍चितच या व्हेईकलचा उपयोग होईल. प्रदूषण विरहित ही मोपेड असेल.'' 
सिद्धार्थ पती आणि प्रेमानंद रिसबूड (लायकन इलेक्‍ट्रिकल प्रा.लि.) 

""डिजिटलच्या दिशेने देश प्रगती करत आहे. मोबाईल वापरणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे मोबाईल हाच तुमचा ई-मेल आयडी असेल. या पद्धतीचे सॉफ्टवेअर आमच्या कंपनीने डेव्हलप केले आहे. 
- उल्हास बोधनकर आणि सुमीत शेठ (नुम्बा प्रा.लि.) 

""सर्पदंश झाला असेल, तर तो विषारी की बिनविषारी सापामुळे झाला आहे. हे अवघ्या तीन मिनिटांमध्ये समजू शकते. रक्ताचा नमुना तपासून त्यावर निदान करता येते. या पद्धतीचे डायग्नम हे उपकरण विकसित केले आहे.'' 
- मेधा सोनावणे-निकम, ऑक्‍झोलोटल बायोटेक्‍नॉलॉजीज्‌ प्रा.लि.

Web Title: pune news Promotion of the concept of innovation