प्रोत्साहन लाभाची रक्कम महिलांच्या खात्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पुणे - छत्रपती शिवाजी कृषी सन्मान योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे, त्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून देण्यात येणारी 25 हजार रुपयांची रक्कम कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुणे - छत्रपती शिवाजी कृषी सन्मान योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे, त्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून देण्यात येणारी 25 हजार रुपयांची रक्कम कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यभरातून कर्जमाफी आणि प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी 56 लाख 59 हजार 187 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 2 लाख 98 हजार 56 अर्ज पुणे जिल्ह्यातून दाखल केले गेले. त्यामध्ये कर्जमाफी आणि प्रोत्साहन लाभाच्या अर्जांचा समावेश आहे. 13 तालुक्‍यांमध्ये इंदापूर तालुक्‍यातून सर्वाधिक 34 हजार 787 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर सर्वांत कमी 4 हजार 209 अर्ज वेल्हा तालुक्‍यातून दाखल झाले.

एकूण अर्जांपैकी 24 हजार 995 अर्जदारांनी आधार कार्डाची माहिती किंवा आधार कार्ड दिलेले नाहीत. त्यामुळे त्या अर्जांच्या छाननीसाठी स्वतंत्र प्रणाली कार्यरत केली जाईल. आधार कार्ड जोडणीमुळे नोंदणी झालेल्या पत्त्यावरून संबंधित शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील आहे, त्याची शेती कोणत्या तालुक्‍यात आहे, तसेच त्याने कोणत्या बॅंकेतून पीककर्ज घेतले आहे, हे कळणार आहे. त्यामुळे समांतर पातळीवर सहकारी, खासगी आणि व्यावसायिक बॅंकांकडून संकलित केलेली माहिती आणि ऑनलाइन अर्जात दिलेली माहिती यांची काटेकोर छाननी केली जाणार आहे. आधार कार्ड जोडणीमुळे दुबार, तिबार नावांची शक्‍यता नसून योग्य आणि पात्र लाभार्थींना लाभ मिळेल. लाभार्थी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी आणि प्रोत्साहन लाभ योजनेचा फायदा देण्यासाठी महसूल, ग्रामविकास, कृषी आणि सहकार विभाग तसेच खासगी राष्ट्रीयीकृत बॅंकांचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागले आहेत.

दोन ऑक्‍टोबरपूर्वी "चावडी वाचन'
येत्या दोन ऑक्‍टोबरपूर्वी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, चावडीच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या मदतीने ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या नावांचे "चावडी वाचन' करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक तालुका स्तरावर तयार झाले असून, चावडी वाचनामध्ये नावाच्या यादीबाबत किंवा नाव नसल्यास आक्षेप असेल त्यांनी अर्ज केल्याचा पुरावा आणि लेखी अर्ज तातडीने उपस्थित अधिकाऱ्यांना द्यावेत किंवा तीन दिवसांच्या आत संबंधित तालुका सहायक निबंधक कार्यालयात जमा करता येणार आहेत.

Web Title: pune news Promotional Benefit Amount on Women's Account