पुणे स्मार्ट सिटीकडून आणखी 275 सायकली...

पुणे स्मार्ट सिटीकडून आणखी 275 सायकली...
पुणे स्मार्ट सिटीकडून आणखी 275 सायकली...

पुणे : पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (PSCDCL) वतीने आणखी मोठ्या संख्येने सायकली या सेवेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. ओफो कंपनीच्या सहकार्याने 275 सायकली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उपलब्ध करण्याचे आणखी एक स्मार्ट पाऊल उचलण्यात आले आहे. सुरवातीच्या ९०दिवसांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे.

PSCDCL ने झूमकार पेडलच्या सहकार्याने 5 डिसेंबर 2017 रोजी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्घाटन करून पुणे विद्यापीठात ही सायकल शेअरिंग सेवा सुरू केली. तिथे शंभर सायकली, तर औंधमध्ये 7 डिसेंबरपासून 75 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या. पहिल्या महिन्यातच 26 हजारांहून अधिक पुणेकरांनी या सेवेचा लाभ घेतला. हा प्रतिसाद पाहून ओफोच्या सायकली मोफत उपलब्ध करण्याचे पाऊल पुणे स्मार्ट सिटीने उचलले आहे.

ओफोचे मोबाईल अॅप वापरून ही सायकल ऑनलाईन लॉग इन करून अनलॉक करता येते. या सायकली मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, सायकलचा वापर कुठे व कसा होत आहे याचा जीपीएसच्या माध्यमातून संपूर्णपणे मागोवा ठेवला जातो. ओफोच्या या सायकली सध्या केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातच वापरण्यासाठी देण्यात येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सायकलींना विद्यापीठ आणि औंध परिसरात पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच, हे वाहन पर्यावरणपूरक असल्याने याचे स्वागत आणि कौतुक सर्वत्र केले जात आहे.

ओफो ही सायकल शेअरिंग कंपनी असून, वीस देशांमधील 250 शहरांमध्ये त्यांच्या एक कोटीहून अधिक सायकली उपलब्ध आहेत. सुमारे 20 कोटी लोक ही सायकल सेवा वापरत आहेत. स्मार्टफोन अॅप्लिकेशनवरून अनलॉक करून ही इतर देशांमध्ये ही सेवा सशुल्क उपलब्ध आहे.  ओफो सध्या भारतात वाहतूक क्षेत्रातील व्यवसायाचा अभ्यास करत आहे. यामध्ये व्यापक संशोधनसोबतच पायाभूत सुविधांच्या मर्यादाही कंपनी लक्षात घेत आहे.

ओफो अॅपमधून सायकल लॉक आणि अनलॉक करता येतेच, शिवाय त्या सायकलचे पार्किंग कुठे केले आहे हेही पाहता येते. अशा सेवांमध्ये सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा असतो हे लक्षात घेऊन ओफो कंपनीने जीपीएस तंत्रज्ञान वापरून या सायकली पूर्णतः सुरक्षित बनवल्या आहेत.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांचा त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा वापरणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियाही आम्ही घेत आहोत. झूमकार पेडलच्या सोबत ओफो सायकलचा आणखी एक पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करत असल्याचा आम्हाला आनंद वाटत आहे. प्रायोगिक तत्त्वावर ९० दिवस मोफत सेवा दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार पुढे नाममात्र शुल्कामध्ये ही सेवा देण्यात येईल.”

ओफोच्या सार्वजनिक धोरण आणि संपर्क विभागाच्या संचालक राजर्षी सहाय म्हणाले, “पुणे स्मार्ट सिटीच्या सहकार्याने विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यागतांना सायकलींचा सोयीस्कर पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वापरण्यास सोपी अशी ही सुविधा कमी खर्चात शेवटच्या मैलापर्यंत देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नागरिकांना या सेवेचा लाभ होईल आणि हा पथदर्शी उपक्रम यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे. ओफोच्या अॅपद्वारे दररोज 3 कोटी 20 लाख सायकल फेऱ्या पूर्ण केल्या जातात.”

आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल पिवळ्या रंगातील या सायकली 24 तास वापरता याव्यात या दृष्टीने त्यांना डायनामो आणि लाईट हेदेखील बसवण्यात आले आहे.  आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे बनवण्यात आल्यामुळे या सायकली वजनाने हलक्या, मजबूत आणि चालवण्यास आनंददायी अशा आहेत, असे राजर्षी सहाय यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com