नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पोलिस ठाण्यात तक्रार देताना येणाऱ्या अडचणी, ऑनलाइन फसवणूक, रस्त्यावर लुबाडल्यानंतर पोलिसांची मदत कशी घ्यावी, असे अनेक प्रश्‍न नागरिकांना पडतात. या संदर्भात नागरिकांकडून ‘सकाळ’ने प्रश्‍न मागविले होते. या प्रश्‍नांना पुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिलेली उत्तरे.

पोलिस ठाण्यात तक्रार देताना येणाऱ्या अडचणी, ऑनलाइन फसवणूक, रस्त्यावर लुबाडल्यानंतर पोलिसांची मदत कशी घ्यावी, असे अनेक प्रश्‍न नागरिकांना पडतात. या संदर्भात नागरिकांकडून ‘सकाळ’ने प्रश्‍न मागविले होते. या प्रश्‍नांना पुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिलेली उत्तरे.

प्रश्‍न (अनिल जहागिरदार) - एका अज्ञात व्यक्‍तीने २७ जानेवारीला माझ्या क्रेडिट कार्डवरून ९२ हजार रुपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर मी क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले. याबाबत सायबर गुन्हे शाखेत तक्रार नोंदवून संबंधित क्रेडिट कार्ड कंपनीकडे मदत मागितली. तसेच ट्रान्झॅक्‍शन डिस्प्यूट अर्ज भरून दिला. माझ्याकडून सर्व बाबींची पूर्तता झाली आहे का आणि माझे पैसे परत मिळण्यास किती कालावधी लागेल?
शुक्‍ला -
 डेबिट-क्रेडिट कार्डबाबत ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास पोलिस ठाण्यात किंवा पोलिस आयुक्‍तालयातील सायबर गुन्हे शाखेत संपर्क साधावा. सायबर पोलिसांकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यास पैसे देणे हे बॅंकेचे काम आहे. 

प्रश्‍न (मोहन सोनावले) - सहकारनगर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार दिल्यास ती दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीतील आहे, असे म्हणून पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते. 
शुक्‍ला -
 याबाबत सहायक पोलिस आयुक्‍त आणि पोलिस उपायुक्‍तांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील. काही आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाबाबत न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. आर्थिक गुन्ह्यांचा तपास क्‍लिष्ट असतो. त्याचा व्यवस्थित अभ्यास करून नागरिकांना न्याय मिळेल, या दृष्टीने पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच ठेवीदार नागरिकांनीही पैसे गुंतवणूक करताना विचार करूनच ठेवी ठेवाव्यात.  

प्रश्‍न (एक पुणेकर) - वडारवाडी झोपडपट्टीसह काही भागात मटका व्यवसाय सुरू आहे. मटका व्यवसायावर कारवाई करून पुण्याची संस्कृती जपावी. 
शुक्‍ला -
 शहरातील मटका अड्ड्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल. संबंधित पोलिस उपायुक्‍त आणि गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्‍तांना मटका अड्ड्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

प्रश्‍न (सुनील केतकर) - मी ज्येष्ठ नागरिक असून, औंध येथील लोकसंगम विहार हाउसिंग सोसायटीमध्ये राहतो. याबाबत ७ जानेवारी २०१२ रोजी घरफोडीची तक्रार दिली होती. औंध पोलिस चौकी आणि चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अनेकदा भेट घेतली. पत्रव्यवहार केला; पण अद्याप तपास लागलेला नाही.
शुक्‍ला -
 याबाबत चतु:शृंगी पोलिसांना आवश्‍यक सूचना देण्यात येतील.

प्रश्‍न (सोपान वावरे, संतोष बुरांडे) - बॅंक खाते किंवा डेबिट-क्रेडिट कार्डबाबत माहिती विचारण्यासाठी सातत्याने फेक कॉल्स येत आहेत. दिल्ली येथील पोलिस असल्याची धमकी देऊन माहिती विचारली जाते. असे कॉल्स रोखण्यासाठी काय करावे, याबाबत मार्गदर्शन करावे. क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन मोबाईल खरेदी करताना साडेबारा हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत गेल्या मे महिन्यात कोथरूड पोलिस ठाणे आणि सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.
शुक्‍ला -
 अनोळखी व्यक्‍तींना आपल्या मोबाईल, क्रेडिट-डेबिट कार्डबाबत माहिती देऊ नये. कोणत्याही बॅंकेतून नागरिकांना कार्डबाबत माहिती विचारली जात नाही. अशा फेक कॉल्सबाबत नागरिकांनी स्वत: खबरदारी घेतल्यास फसवणूक होणार नाही. 

प्रश्‍न (मुकुंद उजळंबकर) - सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ डिसेंबर रोजी माझ्या पत्नीचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. अद्याप तपास लागलेला नाही.
शुक्‍ला -
 पोलिसांना योग्य तपास करण्याबाबत सूचना देण्यात येतील.

प्रश्‍न (भारती सुंकड) - मी ज्येष्ठ महिला असून, कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ जुलै २०११ रोजी माझे २६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. सतत पाठुपरावा करूनही अद्याप दागिने मिळालेले नाहीत. 
शुक्‍ला -
 कोथरूड पोलिसांना तपास करण्याबाबत सूचना देण्यात येतील. 

प्रश्‍न (अवधूत जोहारी) - मी सेवानिवृत्त असून, कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीत राहतो. एक प्लंबर पाच हजार रुपयांचा धनादेश घेऊन काम न करता पसार झाला आहे. पोलिस यात काही करू शकत नाहीत, असे डहाणूकर पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामध्ये काय मदत करता येईल.
शुक्‍ला -
 कोथरूड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना भेटून तक्रार द्यावी.

प्रश्‍न (ठेवीदार) - कल्याणी नागरी पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण प्रलंबित आहे. या पतसंस्थेत तीन हजार ठेवीदार असून, अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे.
शुक्‍ला -
 पोलिस आयुक्‍तालयातील आर्थिक गुन्हे शाखा किंवा ज्येष्ठ नागरिक कक्षाशी संपर्क साधून तक्रार द्यावी. त्याबाबत योग्य कारवाई करण्यात येईल. 

प्रश्‍न - न्यायालयीन आदेशानुसार पोलिस ठाण्यात सीआरपीसी कलम १५६ (३) अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास अहवाल सादर करण्यासाठी काही कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे का?
शुक्‍ला -
 अशा गुन्ह्यांचा तपास करण्याबाबत कोणताही कालावधी निश्‍चित करण्यात आलेला नाही. 

प्रश्‍न (या भागातील नागरिक) - कात्रज-नवले पूल या महामार्गावर आंबेगाव परिसरात वेश्‍या व्यवसाय सुरू आहे. नागरी वस्तीतील महिला-मुलांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत अर्ज देऊनही काही कारवाई होत नाही.
शुक्‍ला -
 यासंदर्भात संबंधित परिमंडलाच्या पोलिस उपायुक्‍तांना कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात येतील.

Web Title: pune news public security rashmi shukla