दिवाळी सुटीत ‘जंगलचा राजा’ला पसंती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पुणे - दिवाळीची सुटी म्हटलं की भटकंती ही ओघाने आलीच. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हे देखील पुण्यातील भटकंतीच्या ठिकाणांमधील एक महत्त्वाचे आकर्षण. या वर्षी तर जंगलचा राजा सिंह पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला. दिवाळीच्या सुटीत तब्बल एक लाखाहून अधिक पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली.

कात्रज येथे १२९.६ एकरमध्ये वसलेल्या या प्राणिसंग्रहालयाला दररोज किमान चार ते साडेचार हजार पर्यटक भेट देतात. २०१५-१६ मध्ये तब्बल १८ लाख ४७ हजार ४३१ पर्यटकांनी, तर २०१६-१७ मध्ये जवळपास १७ लाख ४६ हजार ३५८ पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयास भेट दिली. विशेषतः उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते.

यंदा दिवाळीच्या सुटीत सरकारी शाळांच्या सहलीद्वारे सुमारे दोन हजार ३८१, तर खासगी सहलीद्वारे ७०१ पर्यटकांनी भेट दिली. जवळपास १५० परदेशी नागरिकांनीही प्राणिसंग्रहालयात हजेरी लावली. यंदा सुटीच्या दिवसांत लहानमुलांच्या तुलनेत प्रौढांची संख्या अधिक असल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ८७ हजार ६०८ प्रौढांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली.

प्राणिसंग्रहालयात सिंहगर्जना होत असल्याने त्याला पाहण्यासाठी यंदा दिवाळीच्या सुटीत पर्यटकांनी मोठी गर्दी केली. प्रामुख्याने शाळांच्या सहली येण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. पुण्यातील रहिवासी आणि शहरात पाहुणे म्हणून आलेल्या मंडळींबरोबरच बिहार, राजस्थानी, बंगाली, तसेच दक्षिणेकडील राज्यातील पर्यटकांची संख्या यंदा तुलनेने अधिक आली होती.
- डॉ. नवनाथ निघोट, उपसंचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

दिवाळीच्या सुटीत भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या
वर्ष    पर्यटकांची संख्या    तिकिटातून जमा झालेली रक्कम (रुपयांमध्ये)

२०१७    १,११,४२२    २४,२९,०७५
२०१६    ७१,८६५    १६,०३,७९०

मुख्य आकर्षण
सिंह, पांढरा वाघ, बिबट्या
विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी

Web Title: pune news public visit to Katraj Zoo