पुणे कृषी बाजार समितीच्या विभाजनाचा घाट!

पुणे कृषी बाजार समितीच्या विभाजनाचा घाट!

पुणे - राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू झाले असताना कार्यकर्त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुन्हा विभाजनाचा घाट नागपुरात घातला जात आहे. हवेली व पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करून त्यावर नव्याने प्रशासकीय मंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, नागपुरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या ‘कुटीर’ बंगल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये आमदारांनी बाजार समित्यांच्या प्रशासकीय मंडळात आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी केली. या समितीवर गेल्या १४ वर्षांपासून प्रशासक आहेत. दोन वर्षांपूर्वी हवेली, मांजरी आणि प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण करण्यात आले होते. प्रशासकीय मंडळाचा कालखंड दोन वर्षांचा झाला आहे. तसेच, उच्च न्यायालयाचे निर्देश आणि ‘महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३’मधील तरतुदीनुसार मुदत संपल्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. निवडणूक प्राधिकरणाकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रारूप मतदार याद्या बनविण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. 

निवडणुका टाळण्यासाठी काही वर्षांपूर्वी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ‘प्रादेशिक बाजार समिती’ असे नामकरण झाले. त्यानंतर पुन्हा हवेली, मांजरी व प्रादेशिक समित्यांचे एकत्रीकरण झाले. सध्या अस्तित्वात असलेल्या ‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती’चे पुन्हा ‘हवेली व पुणे जिल्हा’ असे विभाजन करून मर्जीतील कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याशीदेखील आमदारांनी चर्चा केली असून, मंडळातील निवडीसाठी तातडीने नावे देण्यास सांगितले आहे. तर, सहकार उपनिबंधकांकडून अहवाल मागवून या नेमणुका केल्या जाणार असल्याचेदेखील सूत्रांनी सांगितले.

सोन्याचे अंडे देणारी कोंबडी
सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या बनविण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) यांच्या सहकार्याने मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, निवडणुकांची धास्ती घेऊन विद्यमान सदस्य आणि इच्छुकांनी ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’ असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुन्हा विभाजनाचा घाट घातला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com