‘मॉडर्न’ संस्थेच्या घटनेची प्रत गहाळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

संबंधित संस्थेची घटना उपलब्ध करून देणे हे धर्मादाय कार्यालयास बंधनकारक आहे; परंतु अशाप्रकारे एखाद्या संस्थेची घटना गहाळ करणे हे बेजबाबदारपणाचे आहे. घटना गहाळ करण्यामागे कोणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत का? या प्रकरणात कार्यालयातील अधिकारी सहभागी आहेत का? किंवा कोणाचे वैयक्तिक हितसंबंध जोपासले जात आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
- विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते

पुणे : मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे वाडिया महाविद्यालय गेल्या आठ दशकांहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र, सोसायटी ॲक्‍टनुसार नोंदणी केलेल्या या संस्थेच्या घटनेची अधिकृत प्रत धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडून गहाळ झाली आहे.

माहिती अधिकारात घटनेची प्रत मागविली असता धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. घटनाच गहाळ झाल्यामुळे संस्थेचे व्यवस्थापन भविष्यात अडचणीत येऊ शकते, अशी भीती वर्तविण्यात येत आहे.  

माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि अंजली दमानिया यांनी धर्मादाय कार्यालयाकडून दोन महिन्यांपूर्वी माहिती अधिकार कायद्यांतर्गत संस्थेच्या घटनेची छायांकित (झेरॉक्‍स) प्रत मागविली होती. परंतु कार्यालयाकडून प्रत देण्यास टाळाटाळ करण्यात आली, त्यामुळे अपीलीय अधिकाऱ्यांकडे अपील करण्यात आले.

वास्तविक कोणत्याही संस्थेची घटना ही महत्त्वाची मार्गदर्शक संहिता असते. घटनेत नमूद केलेल्या तत्त्वांनुसार ही संस्था गेली ८५ वर्षे सुरू आहे. संस्थेच्या संविधानात नमूद केल्याप्रमाणे संस्थेतील शिक्षक हेच या संस्थेचे पदाधिकारी व सदस्य असून, त्यांच्यामार्फतच सामाजिक बांधिलकी म्हणून संस्था चालविण्यात येते. मात्र, घटनाच गहाळ झाल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे.

Web Title: Pune News Pune Education Modern Education Society wadia college