पुण्यातील रस्त्यांचे 'सेफ्टी ऑडिट' तीन महिन्यात पूर्ण होणार

ज्ञानेश सावंत
शनिवार, 27 मे 2017

पुणे: वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्याकरिता सुमारे दोनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे "सेफ्टी ऑडिट' करण्यात येत असून, येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर रस्त्यांचा दर्जा, वाहनांची वर्दळ आणि पादचारी या घटकांचा विचार करून उपाययोजना राबविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.

शहरातील खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्षागणिक सरासरी दोन लाख नवी वाहने रस्त्यावर येत असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील (आरटीओ) माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यातच, अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक समस्या गंभीर झाली असून, त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक पादचारी आणि वाहनचालकांसाठी असुरक्षित झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध रस्ते आणि त्यावरील ताण लक्षात घेऊन रस्त्यांचे "सेफ्टी ऑडिट' करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामे हाती घेण्यात आली आहेत.

दरम्यान, उपनगरांमधील काही रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात लोहगाव येथील पुणे विमानतळ परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. तसेच, बाजार पेठांमधील रस्ते आणि काही चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी निरनिराळ्या सुविधा असतील.

"इंडियन रोड काँग्रेस'च्या धोरणानुसार रस्त्यांची पाहणी करण्यात येणार असून, त्यानुसार पुरेशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. ही कामे सुरू असतानाच, रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजीही करण्यात येणार आहे. त्यासाठी "रोड मेंटेनन्स व्हॅन' उपलब्ध केल्या आहेत. सध्या चार गाड्या असून, आणखी चार गाड्या उपलब्ध करण्यात येणार आहेत. नागरिक आणि वाहनचालकांच्या तक्रारीनंतर रस्ते दुरुस्तीची कामे लगेचच हाती घेण्यात येतील, असे पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

ताज्या बातम्याः

Web Title: pune news pune municipal corporation road safety audit