शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

हैदराबाद पाचव्या, तर बंगळूर पहिल्या स्थानावर; 'जेएलएल'चे मूल्यांकन

हैदराबाद पाचव्या, तर बंगळूर पहिल्या स्थानावर; 'जेएलएल'चे मूल्यांकन
पुणे - सर्वाधिक वेगाने बदलणाऱ्या शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुण्याने तेरावे स्थान पटकावले आहे. पुण्याप्रमाणेच हैदराबाद पाचव्या स्थानावर, तर बंगळूर पहिल्या स्थानावर आहे. जगभरातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे हे मूल्यांकन "जेएलएल' या अमेरिकी गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीने केले आहे.

सिटी मोमेन्टम इंडेक्‍स म्हणजे काय?
एखाद्या शहराची अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक बांधकाम बाजाराची स्थिती याचे मूल्यांकन म्हणजे "सिटी मोमेन्टम इंडेक्‍स'. जगभरातील 134 प्रमुख प्रस्थापित व उदयोन्मुख व्यावसायिक केंद्रांचा या "सीएमआय'मध्ये विचार केला गेला आहे. त्यासाठी सामाजिक आर्थिक गती, व्यावसायिक बांधकाम बाजाराची गती आणि नावीन्यता, पर्यावरण व शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन विकास गती हे तीन निकष लावण्यात आले आहेत.

भारताचे वैशिष्ट्य
जगातील सर्वाधिक "डायनॅमिक सिटी' म्हणजे वेगाने बदलणारी शहरे असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. या बाबतीत आपल्या देशाने चीनला मागे टाकले आहे. देशांतर्गत शहरांमध्ये बंगळूर शहराने प्रथम क्रमांक, तर हैदराबादने दुसरा आणि पुण्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ चेन्नई, दिल्ली व मुंबईचा क्रमांक लागतो.

वेगाने बदलणाऱ्या शहरांमध्ये पुणे 13 क्रमांकावर
सर्वाधिक वेगाने बदलणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याचा 13 वा क्रमांक आहे. या श्रेणीमध्ये दिल्ली व मुंबई तसेच न्यूयॉर्क, बिजिंग, सिडनी आणि पॅरिस या शहरांना पुण्याने पिछाडीवर टाकले आहे. लोकसंख्या, दळणवळण, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण, बांधकाम, गुंतवणूक, सदनिका व कार्यालयांच्या किमती, कॉर्पोरेट उपक्रम आणि अर्थव्यवस्था या दहा निकषांवर शहरांची क्रमवारी ठरविण्यात आली आहे.

धोक्‍याचा इशारा
पुण्याने अन्य शहरांना मागे टाकले असले तरी दीर्घकालीन परिस्थितीचा विचार करता शहराचा बदलाचा वेग कायम राहील किंवा नाही याबाबत साशंकता आहे. सामाजिक-आर्थिक बदलाची गती आणि व्यावसायिक बांधकाम क्षेत्रातील बदलाची गती आश्‍वासक आहे मात्र दीर्घकालीन बदलाच्या गतीचे चित्र सकारात्मक नसल्याचे इंडेक्‍समध्ये नमूद करण्यात आहे.

Web Title: pune news pune number 13th in world cities