पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट 20 रुपये ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्याची सबब सांगत, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून आता 20 रुपये केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली असून, 15 जूनपर्यंत प्रवाशांना वाढीव दराने प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावे लागणार आहे. प्लॅटफॉर्म तिकीट न घेता नागरिक रेल्वे स्थानकावर आले, तर त्यांना किमान 250 रुपये दंड होणार आहे. 

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्याची सबब सांगत, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून आता 20 रुपये केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली असून, 15 जूनपर्यंत प्रवाशांना वाढीव दराने प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावे लागणार आहे. प्लॅटफॉर्म तिकीट न घेता नागरिक रेल्वे स्थानकावर आले, तर त्यांना किमान 250 रुपये दंड होणार आहे. 

कोणत्याही शहरातील रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवायचे असतील, तर केंद्रीय रेल्वे मंडळाने संबंधित विभागाच्या व्यवस्थापकांना अधिकार दिलेले आहेत. त्याचा वापर करीत पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविले आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यांत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुट्या, लग्नसराई आदी कारणांमुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळे या काळात रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी होते. त्यातून रेल्वे स्थानकावर सोडायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढते. त्यामुळे प्रवाशांना उपद्रव होतो. तसेच, रेल्वे स्थानकावर पादचारी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. नव्या काही प्रकल्पांचीही कामे नजीकच्या काळात सुरू होणार आहेत. त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. प्लॅटफॉर्म तिकिटाचे वाढलेले दर पुणे विभागात केवळ पुणे रेल्वे स्टेशनसाठीच लागू असतील. शिवाजीनगर, खडकीसह अन्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर दहाच रुपये असतील, असेही स्पष्ट केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून लोकलसह दररोज सुमारे 218 गाड्यांची ये-जा होते. सुमारे एक लाख 10 हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्लॅटफॉर्म तिकीट काढून दररोज स्थानकावर येणाऱ्या नागरिकांची सरासरी संख्या सुमारे 6 हजार 300 असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. 

प्लॅटफॉर्म तिकीट घेणार कोण ? 
पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट 20 रुपयांना झाले आहे. मात्र, पुणे-लोणावळा (64 किलोमीटर) लोकलचे तिकीट 15 रुपये असून, पुणे- दौंडसाठी (76 किलोमीटर) तिकीट 20 रुपयांना आहे. पुणे-उरुळी कांचन, देहूरोड प्रवासाचे तिकीट 10 रुपये, तर पुणे-आकुर्डी प्रवासाठी लोकलचे तिकीट 5 रुपये आहे. पाच रुपयांचे तिकीट एक तासासाठी, तर 10 रुपयांचे तिकीट 3 तासांसाठी वैध असते. त्यामुळे 5 किंवा 10 रुपयांचे तिकीट घेऊन नागरिक रेल्वे स्थानकावर जाऊ शकतात. त्यामुळे 20 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट कोण घेणार ? असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

Web Title: pune news pune railway station platform ticket