अपघात... फोन... अन्‌ उभारला दुभाजक 

अपघात... फोन... अन्‌ उभारला दुभाजक 

पुणे - दुभाजकामुळे झालेल्या अपघाताची माहिती एका महिलेने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना भल्या पहाटे कळविल्यावर अवघ्या सहा तासांत महापालिकेने घटनास्थळी काम सुरू करून सुखद धक्का दिला अन्‌ सातारा रस्त्यावर अपघातस्थळी एका दिवसात दुभाजकही उभारण्यात आला. ठरविले तर महापालिका प्रशासन काम करून नागरिकांना दिलासा देऊ शकते, हे या उदाहरणातून दिसून आले. 

प्रेमनगर चौकापासून काही अंतरावर सातारा रस्त्यावर दुभाजकावर नागरिक शिल्पा मेनन यांच्या मुलाचा रविवारी पहाटे दीडच्या सुमारास अपघात झाला. त्याची दुचाकी दुभाजकावर आदळली होती. त्यामुळे डोक्‍याला डोळ्याजवळ दुखापत होऊन त्याला 22 टाके पडले. त्यामुळे मेनन अस्वस्थ झाल्या. त्यांनी पहाटे साडेचारच्या सुमारास आयुक्तांना "एमएमएस' करून सातारा रस्त्यावरील दुभाजकांच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी विनंती केली. आयुक्तांनी त्यांना तातडीने प्रतिसाद देत लवकर काम करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर त्या रस्त्यावर रविवारी सकाळी दहा वाजता कामही सुरू झाले. सातारा रस्ता फेररचनेचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे बीआरटी मार्गावरील काही दुभाजक हलविले होते; मात्र सिमेंटचे लहान आकाराचे चौकोनी दुभाजक रस्त्यावरच होते. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत होते. "सकाळ'नेही याबाबत सातत्याने वार्तांकन केले होते. 

अपघात झालेल्या ठिकाणी व लगतच्या वीस मीटर रस्त्यावर महापालिकेच्या पथ विभागाने दुभाजकांची दुरुस्ती केली. तसेच एक फूट उंचीचे दुभाजक बसविण्याचे काम सुरू केले. आयुक्तांच्या या तत्परतेमुळे मेनन यांनी त्यांचे व प्रशासनाचे "फेसबुक'वरही कौतुक करून धन्यवाद दिले. 

दुभाजकांच्या उंचीबाबत महिन्यात कार्यवाही 
बाणेर रस्त्यावर दुभाजकावर मोटार चढून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुभाजकांच्या उंचीबाबत सर्वसाधारण सभेतही अनेक मुद्दे उपस्थित झाले. त्यानंतर महापालिकेने प्रमुख 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे एका तज्ज्ञ संस्थेच्या मदतीने "सेफ्टी ऑडिट' सुरू केले आहे. एक महिन्यात ते पूर्ण होणार आहे. त्या ऑडिटमध्ये दुभाजकांची उंची, गतिरोधक-रंबलर्स आदींचाही अंतर्भाव आहे. त्यानुसार प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांची दुरुस्ती होणार असून, गतिरोधकांबाबतही धोरण निश्‍चित होईल, असे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी नमूद केले. शहरातील एकूण एक हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट होणार आहे. पहिल्या टप्प्यात 200 किलोमीटरचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com