एकाच पुलावर मोठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पुणे रेल्वे स्थानकावरील स्थिती; दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना

पुणे - रेल्वे स्टेशनवर पादचाऱ्यांसाठी तीन पूल असूनदेखील एकाच पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही बाब विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने समांतर पूल उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रेल्वे पोलिसांची नेमणूक करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत; परंतु भविष्याचा विचार करता त्यात अधिक सुधारणा करणे आवश्‍यक आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील स्थिती; दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना

पुणे - रेल्वे स्टेशनवर पादचाऱ्यांसाठी तीन पूल असूनदेखील एकाच पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही बाब विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने समांतर पूल उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रेल्वे पोलिसांची नेमणूक करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत; परंतु भविष्याचा विचार करता त्यात अधिक सुधारणा करणे आवश्‍यक आहे.

मुंबईतील एलफिस्टन ते परळी दरम्यानच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर पुणे रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलांच्या आढावा घेतल्यानंतर ही गोष्ट निदर्शनास आली. 

पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या तीन पूल आहेत. त्यापैकी दत्तमंदिरपासून जाणाऱ्या पुलावर सर्वाधिक गर्दी उसळते. सायंकाळच्या वेळेत अनेकदा या पुलावर चेंगराचेंगरी होते. दरम्यान, माजी आमदार मोहन जोशी यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात 
आले आहेत.

अन्य पूल वापरा
दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत मोठ्या प्रमाणावर प्रवासी या पुलावरून ये-जा करतात. त्या वेळी रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. याशिवाय पार्सल विभाग आणि सोलापूरच्या दिशेने दोन पादचारी पूल नव्याने उभारले आहेत. मात्र, त्याचा वापर प्रवाशांकडून होत नाही. त्यामुळे एकाच पुलावर गर्दी होत असून गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी अन्य पुलांचाही वापर करावा, असे आवाहन रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी केले आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरील सद्यःस्थिती
जुन्याच पुलावर सर्वाधिक गर्दी
गर्दी नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे
गर्दीच्या वेळेस रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

नवीन उपाययोजना
नवा पादचारी पूल व जुन्या पुलांना जोडणाऱ्या स्कॉयवॉकचे काम सुरू
जुन्या पुलाला समांतर नवीन पूल, सरकता जिना आणि लिफ्टची सुविधा

जुन्या पादचारी पुलाला समांतर आणखी एक पूल उभारण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले असून येत्या चार महिन्यांत हे काम पूर्ण होईल. स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे कार्यालयापासून हा पूल निघून दत्तमंदिराजवळ उतरणार आहे. तसेच या पुलावर जाण्यासाठी लिफ्ट आणि सरकता जिना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय पार्सल विभाग येथे नव्याने उभारण्यात आलेला पादचारी पूल आणि जुना पादचारी पूल यांना जोडण्यासाठी स्कायवॉक उभारण्याचे काम सुरू आहे. तीनही पुलांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

रेल्वे प्रशासनाकडून स्टेशनवर नव्याने उभारण्यात आलेल्या दोन्ही पुलांचे नियोजन चुकले आहे. त्यामुळे जुन्याच पुलावर प्रवाशांची गर्दी उसळते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईप्रमाणे पुण्यात कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाकडून आवश्‍यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

२ लाख दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या
२२० रोज येणाऱ्या-जाणाऱ्या, येथून सुटणाऱ्या गाड्या
३ पादचारी पूल

Web Title: pune news pune station railway over bridge rush