सरकारला, आता तरी जाग येणार का?

अविनाश चिलेकर
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पुणे आणि पिंपरी-चिंचवड गेल्या पंधरा वर्षांत ‘श्रीमंती’ झाले ते हिंजवडी, खराडी, तळवडेच्या आयटी-बीटी उद्योगांमुळे. आज मितीला ४० हजार कोटींची निर्यात, सात लाख रोजगार, अब्जावधी रुपयांची उलाढाल आहे. बांधकाम उद्योगालाही केवळ आयटीमुळे बरकत आली. परिसराला विदेशी लुक मिळाला. मात्र, सद्या इथे काम करणारा प्रत्येकजण त्रस्त आहे, तो वाहतूक कोंडीमुळे. अवघ्या सहा किलोमीटर अंतरासाठी दोन-दोन तास वाहने खोळंबून असतात. सकाळी-सायंकाळी सर्व चौक आव्हेरफ्लो होतात.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड गेल्या पंधरा वर्षांत ‘श्रीमंती’ झाले ते हिंजवडी, खराडी, तळवडेच्या आयटी-बीटी उद्योगांमुळे. आज मितीला ४० हजार कोटींची निर्यात, सात लाख रोजगार, अब्जावधी रुपयांची उलाढाल आहे. बांधकाम उद्योगालाही केवळ आयटीमुळे बरकत आली. परिसराला विदेशी लुक मिळाला. मात्र, सद्या इथे काम करणारा प्रत्येकजण त्रस्त आहे, तो वाहतूक कोंडीमुळे. अवघ्या सहा किलोमीटर अंतरासाठी दोन-दोन तास वाहने खोळंबून असतात. सकाळी-सायंकाळी सर्व चौक आव्हेरफ्लो होतात.

रस्त्यांवर दोन-तीन किलोमीटरवर लांबच लांब रांगा लागतात. या त्रासाने हैराण झालेले आणि आधीच कामाने शिणलेले आयटियन्स सरकारी यंत्रणेला रोज लाखोल्या वाहतात, बोटे मोडतात. दिवसेंदिवस हा प्रश्‍न अतिशय गंभीर, स्फोटक आणि उग्र होत आहे. अद्याप उद्रेक झाला नाही इतकेच. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर केव्हा काय होईल याचा नेम नाही. तेव्हा सावधान!

कागदी घोडे, बथ्थड प्रशासन
आमचे तमाम राज्यकर्ते (आघाडी असो वा युती) बघ्याची भूमिका घेतात, फक्त कागदी घोडे नाचवतात. पर्याय शोधण्यासाठी चर्चा, बैठका, आराखडे यांचा आजवर निव्वळ फार्स झाला. लाल फितीत अडकलेले गेंड्याच्या कातडीचे बथ्थड प्रशासनही लक्ष देत नाही. या परिस्थितीला वैतागून अखेर हतबल उद्योजकांनी एकत्र येत ‘मेट्रो झिप’ ही १३० बसची सार्वजनिक सेवा सुरू केली. ज्यांच्याकडे चार चाकी आहेत, त्यांनी मिळून ‘कार पुलींग’ (अन्य चार सहप्रवाशांसह) सेवा प्रत्यक्षात आणली. सार्वजनिक बसचा वापर वाढवला. त्यासाठी पीएमपीचे लंगडे घोडे १३ मार्गांवर कसेबसे धावत आहेत.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला धावायला अजून दोन-तीन वर्षे जातील. आजची स्थिती भयंकर आहे. जे काही उपाय योजले ते तोकडे पडले. प्रश्‍न यत्किंचितही (१० टक्के) सुद्धा सुटलेला नाही.
 
अन्य मार्गांवरही मेट्रो
फक्त हिंजवडी परिसरात रोज एक लाख चार चाकी, दीड लाखावर दुचाकी, पाच हजार बस तसेच दहा हजारांवर रिक्षा, टेंपो मिळून जवळपास पावणे तीन लाख वाहने रस्त्यावर असतात. हिंजवडीतून पुणे, पिंपरी-चिंचवडकडे जाणारे विविध सात रस्ते आहेत. आजची वाहतूक कोंडी कशी, कुठवर आहे, याचा अनुभव घ्यायचा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या ताफ्यासह सकाळी अथवा सायंकाळी हिंजवडीला फेरफटका मारावा. शिवाजी चौक, भूमकर चौक, विप्रो सर्कल, एचडीएफसी बॅंक, इन्फोसिस सर्कल (ग्रॅण्ड तमन्ना) या चौकांचा आणि वाहनचालकांचाही श्‍वास कोंडलेला असतो. रोज पाच लाख लिटर इंधनाचा धूर होतो. ध्वनी आणि हवा प्रदूषण पातळीत टोकाला असते. वाहनांचे किरकोळ अपघात, घासाघीस नित्याची आहे. आयटीयन्सना आता अक्षरशः नको नको झाले. या संकटातून मार्ग काढण्यासाठी एका आयटीयन्स मुलीने सुनसान अशा चांदे-नांदे रस्त्याचा पर्याय निवडला तर तिच्यावर विनयभंगाची आफत ओढावली. समस्येवर उपाय आहेत, पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. हिंजवडीशी निगडित अन्य सर्व रस्ते विकसित केले पाहिजेत. फक्त शिवाजीनगर मेट्रोतून अर्धा प्रश्‍न सुटेल. शंभर टक्के उत्तर हवे तर मेट्रोसेवा निगडी, तळेगाव, चाकण, भोसरीपर्यंत नेण्याचे नियोजन आताच केला पाहिजे.

हिंजवडी आता कुठे दोन टप्पे पूर्ण झाले. तिसरा विकसित होतो आहे. चौथा-पाचवा सर्वांत मोठा परीघ असलेला टप्पा कागदावर आहे. पाचही टप्प्यांतील उद्योग भरभरून वाहतील त्या वेळी चित्र काय असेल कल्पना करवत नाही.   

Web Title: pune news pune traffic issue