विद्यापीठाने दुर्लक्ष केल्याने अडीच कोटी रुपयांचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुसज्ज असे विद्यार्थी सुविधा केंद्र उभारण्यासाठी पैशांसह सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, निश्‍चित केलेल्या जागेवरील झाडे पाडण्यास परवानगी नसल्याने या केंद्राचे बांधकाम तब्बल चार वर्षे सुरू केले नाही. याकडे विद्यापीठ प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने विद्यापीठाला सुमारे अडीच कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 

विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सेवा आणि सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी भव्य असे सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय विद्यापीठाने 2013 मध्ये घेतला होता. एकूण 18 कोटी 88 लाख रुपयांचे हे बांधकाम होते. त्यापोटी विद्यापीठाने आठ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले. परंतु, चार वर्षे उलटली, तरी त्याचे बांधकाम सुरू झालेले नाही. विद्यापीठाच्या एका अधिसभा सदस्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत माहिती मागितल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाने झाडे तोडण्यास परवानगी दिली नसल्याने बांधकाम सुरू झाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. 

अधिसभा सदस्य संतोष ढोरे म्हणाले, ""विद्यार्थी सुविधा केंद्रासाठी जागेची वा झाडांची अडचण होती, तर इतर जागी त्याचे बांधकाम करायला हवे होते. परंतु, विद्यापीठाने त्यासाठी कोणताही पाठपुरावा केलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेला पैसा हा विद्यार्थ्यांचा आहे. ते पैसे बांधकाम विभागाकडे चार वर्षे पडून होते. हे पैसे बॅंकेत ठेवले असते, तर विद्यापीठाला अडीच कोटी रुपयांचे व्याज मिळाले असते. आता ते मिळणार नाही. त्यामुळे या गैरकारभाराला जबाबदार असणाऱ्यांवर विद्यापीठाने कारवाई केली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र हे झालेच पाहिजे. त्यामुळे त्यासाठी विद्यापीठाने त्वरित कार्यवाही करावी.'' 

Web Title: pune news pune university