बहिःस्थचे शुल्क कमी झाले नाही, तर आंदोलन !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

बहिःस्थ पद्धत ही गरजूंसाठी संधी आहे, ती सुरूच ठेवली पाहिजे, त्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून अभ्यासाचे साहित्य दिले पाहिजे. त्याचे शुल्कही माफक असावे. या विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था करता येईल, त्यासाठी निवृत्त प्राध्यापकांची मदत घेता येईल. 
- डॉ. ए. पी. कुलकर्णी, प्रांतप्रमुख, महाराष्ट्र, विद्यापीठ विकास मंच

पुणे : बहिःस्थ परीक्षेचे शुल्क अन्यायकारकच आहे. गरजू विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणाचे, पदवी मिळविण्याचे स्वप्न हिरावून घेण्याचा प्रयत्न विद्यापीठ करीत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विविध विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे. येत्या आठ दिवसांत बहिःस्थचे शुल्क कमी झाले नाही, तर विद्यापीठात आंदोलन करण्याचा इशारादेखील या संघटनांनी दिला आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाकडून बहिःस्थ विद्यार्थ्यांसाठी नियमित महाविद्यालयांपेक्षा दुपटीहून अधिक शुल्क स्वीकारले जात आहे. विद्यापीठाच्या या धोरणाचा विद्यार्थी संघटनांकडून निषेध व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे प्रतीक दामा यांनी बहिःस्थचे शुल्क आठ दिवसांत कमी करा, अशी मागणी केली आहे. ज्यांना महाविद्यालयांत जाता येत नाही, त्यांच्यासाठी जाचक शुल्क आकारले जात असेल, तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

युवासेनेचे शहराध्यक्ष किरण साळी म्हणाले, ''बहिःस्थ विद्यार्थी हा पूर्णवेळ वर्गात जात नाही, त्याला अभ्यासाचे साहित्य मिळत नाही. मग सहा हजार रुपये कशाचे घेतले जातात, याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी 'कमवा आणि शिका'सारख्या योजना सरकार राबविते. विद्यापीठ मात्र धंदेवाईक पद्धतीने शुल्क आकारते. त्यामुळे बहिःस्थचे शुल्क आठ दिवसांत कमी करावे.'' 

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे सतीश गोरे म्हणाले, ''पुणे विद्यापीठाएवढे बहिःस्थ शुल्क कोणत्याही विद्यापीठात आकारले जात नाही. हालाखीच्या स्थितीत पदवीचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे जाचक आहे.'' 

Web Title: Pune News Pune University Pune Education External education