पुरंदर विमानतळाला सशर्त परवानगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

पुणे - हैदराबाद-मुंबई विमानमार्ग, लोहगाव व एनडीए आणि पुरंदर येथील नियोजित विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांच्या उड्डाणांमध्ये हवाई अडथळे निर्माण होऊ शकतात. या व अशा काही तांत्रिक अडचणी असून त्या दूर कराव्यात, या अटी-शर्तींवर पुरंदर येथील नियोजित विमानतळास हवाई दलाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्या अटींची पूर्तता करण्याचे आश्‍वासन विमानतळ विकास प्राधिकरणाने दिले आहे. या अटी-शर्तींची पूर्तता केल्यानंतर एअरपोर्ट ऍथॉरिटीचे एक पथक पुन्हा एकदा या जागेची पाहणी करणार असून, त्यानंतर अंतिम मान्यता मिळणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा गेल्या आठवड्यात पुण्यात आले होते. त्यांनी पश्‍चिम विभागातील सर्व विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळास हवाई दलाने मान्यता दिली आहे.

पुरंदर येथील विमानतळास मान्यता देण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून हवाई दलापुढे मान्यतेसाठी पडून होता. नियोजित विमानतळाच्या धावपट्टीवरून काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे हा प्रस्ताव अडकून पडला होता. धावपट्टीच्या दिशेबाबत असलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे हवाईदलाने काही अटींवर ही मान्यता दिली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

विशेषतः हैदराबाद-मुंबई दरम्यान ये-जा करणाऱ्या विमानांच्या मार्गात पुरंदर विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांच्या मार्गाची पुनर्रचना करावी, लोहगाव आणि नियोजित पुरंदर विमानतळाची रनवे आणि एनडीए येथील विमानतळाचा हवाईमार्ग यामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, या अटींवर ही मान्यता देण्यात आली आहे. या तांत्रिक अडचणी पूर्ण केल्यानंतर एअरपोर्ट ऍथॉरिटीचे पथक त्याची पाहणी करेल, त्यानंतर अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

खासदार शिरोळे अनुपस्थित
भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे मोहापात्रा यांनी पुण्यात येऊन बैठक घेतली, त्या बैठकीला विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांना पाचारण करण्यात आले नाही. संचालक अमित कुमार यांनीदेखील त्यासाठी पुढाकार घेतला नाही. शिरोळे यांच्या अनुपस्थितीत मोहापात्रा यांनी पुरंदर विमानतळाबाबत घोषणा कशी केली, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यावर चर्चा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: pune news purandar airport permission