जैव वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्‍न कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

आरोग्याचा धोका वाढतोय; सर्वांनी एकत्रित मार्ग काढण्याची गरज

पुणे - शहरातील सर्व जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागत नसल्याने पुणेकरांच्या आरोग्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी डॉक्‍टर, महापालिका आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीने एकत्र येऊन समस्येतून मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. 

आरोग्याचा धोका वाढतोय; सर्वांनी एकत्रित मार्ग काढण्याची गरज

पुणे - शहरातील सर्व जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागत नसल्याने पुणेकरांच्या आरोग्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी डॉक्‍टर, महापालिका आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीने एकत्र येऊन समस्येतून मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शहरातील रुग्णालयांमधील वैद्यकीय कचरा संकलनाची व्यवस्था निर्माण झाली आहे; पण काही दवाखाने, रक्तपेढ्या व प्रयोगशाळांमधून नियमित कचरा संकलन होत नाही. त्यामुळे यातून निर्माण होणारा कचरा सामान्य कचऱ्यातच टाकला जातो. वैद्यकीय कचऱ्यामध्ये रोगजंतू असण्याचा धोका असतो. सामान्य कचऱ्यातून या रोगजंतूंचा प्रसार होण्याची भीती असते. त्यामुळे या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्‍यक असते. हे काम महापालिकेने पास्को या खासगी कंपनीकडे सोपविले आहे. शहरातील १२ हजार डॉक्‍टर वैद्यकीय सेवा देतात. त्यापैकी जेमतेम तीन हजार डॉक्‍टरांनी जैव कचऱ्यासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे शहरात वैद्यकीय कचऱ्याचा धोका वाढत असल्याचा निष्कर्ष या क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे. 

शहरातील डॉक्‍टरांनी जैव वैद्यकीय कचरा देण्यासाठी विरोध केला आहे. त्यामुळे बहुतांश डॉक्‍टरांनी यासाठी नोंदणी केलेली नाही.

डॉक्‍टर काय म्हणतात?
जैव वैद्यकीय कचरा संकलनाचे पैसे भरूनही सेवा मिळत नाही, ही यातील मुख्य समस्या असल्याचे ‘जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन’चे (जीपीए) अध्यक्ष डॉ. संतोष गोसावी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘डॉक्‍टरांच्या कामाच्या वेळेत जैव कचरा संकलन करणारे वाहन येते. परिणामी, वैद्यकीय कचरा घेऊन गाडीच्या ठिकाणी जाणे शक्‍य होत नाही. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य कोठीतून कचरा उचलण्याचा पर्याय पुढे आला आहे.’’ 

कचरा संकलन पॉइंटची संख्या वाढविणार

जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. त्यासाठी डॉक्‍टरांनी पुढे येणे आवश्‍यक असल्याचे मत ‘पास्को’चे संचालक प्रदीप मुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘वेळेवर कचरा देणे आणि योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यास मदत केली पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून सुधारणा होत आहे; पण,त्याचा वेग वाढणे आवश्‍यक आहे. जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत कायदा आहे. त्याची भीती कमी असावी, कचरा संकलनासाठी पैसे भरावे लागतात. तसेच हा कचरा वेगळा करण्याची मानसिकता नाही, ही यामागची प्रमुख कारणे आहेत.’’

आतापर्यंत २० खाटांच्या पुढच्या रुग्णालयांमध्ये जाऊन जैव वैद्यकीय कचरा संकलित केला जात होता. त्यासाठी २०० ते २५० पॉइंट होते. ते आता १० खाटांच्या रुग्णालयांपर्यंत खाली आणले आहेत. त्यासाठी ५८० पॉइंट केले आहेत. लवकरच त्यात आणखी पॉइंटची भर पडणार आहे. त्यामुळे डॉक्‍टरांना त्यांच्या क्‍लिनिकच्या जवळच्या पॉइंटवर कचरा टाकता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जैव वैद्यकीय कचरा म्हणजे काय?
रुग्णालय, प्रयोगशाळा किंवा दवाखान्यात निर्माण होणाऱ्या कचऱ्याला जैव वैद्यकीय कचरा म्हणतात. सुया, सलाइनच्या बाटल्या, जखमांवर लावलेल्या पट्ट्या अशांचा यात समावेश होतो. काढलेले शरीराचे अवयवदेखील या कचऱ्याचा भाग असतो. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्‍यक असते.

Web Title: pune news The question of bio-medical waste was fixed