विशेषांना दृष्टी देणारा ध्येयवेडा

मीनाक्षी गुरव
मंगळवार, 9 जानेवारी 2018

सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असूनही अलौकिक बुद्धिमत्ता, प्रयोगशीलता, सकारात्मक दृष्टिकोन, इनोव्हेशनचा आग्रह धरत कायम आशावादी आणि दूरदृष्टी असलेल्या ध्येयवेड्या राहुल देशमुख यांनी दृष्टिहीन असतानाही अनेकांना दृष्टी देण्याचे काम केले आहे.

सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असूनही अलौकिक बुद्धिमत्ता, प्रयोगशीलता, सकारात्मक दृष्टिकोन, इनोव्हेशनचा आग्रह धरत कायम आशावादी आणि दूरदृष्टी असलेल्या ध्येयवेड्या राहुल देशमुख यांनी दृष्टिहीन असतानाही अनेकांना दृष्टी देण्याचे काम केले आहे.

अंधशाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण पूर्ण करून उच्च शिक्षण घेण्याच्या ध्येयाने राहुल पुण्यात आले. मात्र, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात कुठल्याही वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही. येथेही अंधत्व आड आल्यामुळे त्यांनी रेल्वे प्लॅटफार्मचा आसरा घेतला. या प्रवासातून जाताना त्यांनी दृष्टिहीनांसाठी काम करण्याचा निश्‍चय केला. त्यातूनच २००८ मध्ये ‘स्नेहांकित आणि नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड्‌ (एनएडब्ल्यूपीसी) ही संस्था आकाराला आली.

बारावीत असल्यापासूनच राहुल यांनी सामाजिक कार्याला सुरवात केली. त्यानंतर समाजकल्याण खात्याच्या जिल्हा अपंग पुनर्वसन समितीवर तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. संस्थेचे कामकाज नेटाने चालू ठेवत त्यांनी स्वत:च्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत नेला. बीए, एमए (समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र) याबरोबरच बीएड, एमएसडब्ल्यू, एम. फिल अशा अनेक पदव्या त्यांनी मिळविल्या. अंध-अपंग विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू केले.

राहुल यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी राज्यात पहिल्या संगणक प्रशिक्षण केंद्राची २००३ मध्ये स्थापना केली. याद्वारे त्यांनी आजवर हजारो विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले आहे. तसेच २००९ मध्ये डिजिटल लायब्ररी सुरू केली. या प्रकल्पात अंध विद्यार्थी संगणकाच्या साहाय्याने क्रमिक आणि अवांतर पुस्तके ऐकू शकतात. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या गरजू अंध-अपंग विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय व्हावी, म्हणून त्यांनी ‘चैतन्यविश्‍व’ हे वसतिगृह सुरू केले. 

विशेष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे, या उद्देशाने शहरातील पहिले रिक्रिएशन सेंटरही त्यांनी २०१० मध्ये सुरू केले. तसेच विशेष संगणक प्रशिक्षण केंद्राद्वारे दिव्यांगांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष शिष्यवृत्ती प्रकल्पांतर्गत दरवर्षी दीडशे गुणवंतांना शिष्यवृत्ती दिली जाते. हे सर्व राहुल यांनी नोकरी करत केले आहे. सध्या ते बॅंक ऑफ इंडियाच्या लक्ष्मी रस्ता येथील शाखेत स्केल वन ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. अंधत्व असतानाही राहुल अनेकांना दृष्टी देण्याचे काम करत आहेत. या कामातून अंधाच्या जीवनातच नव्हे, तर मनात आशेची पणती तेवत ठेवले जात आहे.

Web Title: pune news rahul deshmukh