मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने शहराची दाणादाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

पुणे - मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने शहराची दाणादाण उडाली. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी करावयाची नाले सफाईची कामे पूर्ण न केल्याचा फटका सोमवारी दुपारी पुणेकरांना बसला. रस्त्या- रस्त्यांवर गुडघ्याएवढे साचलेले पाणी, त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि कोलमडलेली वाहतूक व्यवस्था असे चित्र शहराच्या वेगवेगळ्या भागात दिसत होते.

रस्ते बनले नाले
शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी दीड ते दोन वाजल्यापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात पावसाला सुरवात झाली. काही मिनिटांतच पावसाने जोर धरला आणि मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. काही क्षणामध्ये पाणी रस्त्यांवरून वाहू लागले आणि रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले. त्यामुळे बाजीराव रस्त्याच्या कडेला लावलेली वाहने पडल्याचीही घटना घडली. 

ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
बुधवार पेठ, मित्रमंडळ चौक, धायरी फाटा, कर्वेनगर, प्रादेशिक परिवहन कार्यालय, ससून रुग्णालय, शिवाजीनगर यासह अनेक भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीची गती मंदावली आणि शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी कार्यालयातून घरी जाताना कर्मचारी या वाहतूक कोंडीत अडकले.

मालधक्का चौक, सुभाषचंद्र बोस चौक, शनिवार वाडा परिसर, भाऊसाहेब खुडे चौक (सिमला ऑफिस), कर्वे रस्ता येथे सायंकाळी उशिरापर्यंत वाहनांची गर्दी होती. कात्रजवरून दुचाकीने अप्पा बळवंत चौकात येण्यासाठी प्रवाशांना ५५ मिनिटे लागले. तसेच धायरी येथून शहरात येण्यासाठीही तासाभराचा वेळ लागल्याची माहिती ‘सकाळ’च्या वाचकांनी दिली. 

झोपडपट्टीत पाणी शिरले
रस्त्यावरून वाहून आलेले पाणी पाटील इस्टेट झोपडपट्टीतील काही घरांमध्ये घुसल्याची माहितीही पुढे आली.

Web Title: pune news rain