राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात मॉन्सूनचे दमदार पुनरागमन होत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. पश्‍चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश किनारपट्टीसह कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. 

पुणे - अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात मॉन्सूनचे दमदार पुनरागमन होत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. पश्‍चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश किनारपट्टीसह कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. 

मॉन्सूनच्या वाटचालीबद्दल हवामानशास्त्र विभागाने यापूर्वीच दिलेल्या वेळापत्रकानुसार येत्या 30 सप्टेंबरला मॉन्सूनचा हंगाम संपत आहे. उर्वरित पंधरा दिवसांत देशभर पावसाचे प्रमाण सरासरीइतके राहील, असा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानच्या उत्तरेकडून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र सप्टेंबरचा पंधरवडा उलटूनही अद्याप मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. 

मध्य-पूर्व अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे; तर वायव्य बंगालच्या उपसागरात पश्‍चिम बंगाल आणि ओडिशादरम्यान समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोसमी पावसास अनुकूल वातावरण होणार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत सर्वदूर पावसाची शक्‍यता आहे. समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि तापमानात झालेली वाढ या प्रभावामुळे या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. 

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्‍यता 
कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता. 16) मुसळधार पासाची शक्‍यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस झाला. कोकणात श्रीवर्धन, अलिबाग, भिरा, माणगाव, रोहा; मध्य महाराष्ट्रात फलटण, लोणावळा, नांदगाव, नगर, सोलापूर, महाबळेश्‍वर यांसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. येत्या सोमवारी (ता. 18) आणि मंगळवारी (ता. 19) कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

* पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता 
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसांतही शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

Web Title: pune news rain