दिवसभर चटक्‍यानंतर गडगडाटासह मुसळधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पुणे - दिवसभर "ऑक्‍टोबर हीट'ची चाहूल देणारा उन्हाचा चटका आणि त्यानंतर संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह कोसळलेला मुसळधार पाऊस, असे वातावरण पुणेकरांनी मंगळवारी अनुभवले. शहरात 7 मिमी पावसाची नोंद झाली.

पुणे - दिवसभर "ऑक्‍टोबर हीट'ची चाहूल देणारा उन्हाचा चटका आणि त्यानंतर संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह कोसळलेला मुसळधार पाऊस, असे वातावरण पुणेकरांनी मंगळवारी अनुभवले. शहरात 7 मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाने उघडीप दिल्यानंतर पुण्यासह राज्यात सप्टेंबर महिन्यातच ऑक्‍टोबर हीटचा अनुभव येत आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. सोमवारी कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसची वाढ झाली होती. तर अवघ्या चोवीस तासांमध्ये पाऱ्याने 3.1 अंश सेल्सिअसची उसळी मारली. मंगळवारी 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात झाली होती.

शहर आणि परिसरात मंगळवारी दुपारी असह्य उकाडा जाणवत होता. उन्हाच्या चटक्‍यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अचानक ढग दाटून आले आणि पावसाच्या दमदार सरी पडल्या. शहराच्या मध्य वस्तीतील पेठा, सिंहगड रस्ता, कोथरूड, पाषाण, येरवडा, विश्रांतवाडी, कात्रज या भागांत पावसाच्या जोरदार सरी पडल्या.

पावसाचा जोर प्रचंड असल्याने काही मिनिटांतच रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. अचानक आलेल्या पावसाने घरी परतणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांची धांदल उडाली.

Web Title: pune news rain