परतीच्या पावसाची दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोकणात पाऊस; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा कोरडा राहील
पुणे - शहरात दोन दिवस विश्रांती घेतलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा रविवारी सुटीच्या दिवशी दमदार हजेरी लावली. मध्य वस्तीतील पेठांसह उपनगरांना ढगांच्या गडगडाटासह पावसाने झोडपले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

कोकणात पाऊस; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा कोरडा राहील
पुणे - शहरात दोन दिवस विश्रांती घेतलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा रविवारी सुटीच्या दिवशी दमदार हजेरी लावली. मध्य वस्तीतील पेठांसह उपनगरांना ढगांच्या गडगडाटासह पावसाने झोडपले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

शहर आणि परिसरात सोमवारी (ता. 23) अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा मात्र कोरडा राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.

दिवाळीचे दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा सक्रिय झाला. सदाशिव, नारायण, नवी पेठ, बुधवार पेठ अशा मध्य वस्तीतील पेठांसह औंध, बाणेर, पाषाण, कोथरूड, सेनापती बापट रस्ता, कात्रज अशा उपनगरांमध्येही सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार सरी पडल्या.

शहरात सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ झाले. त्यानंतर सायंकाळी स्थानिक वातावरणाचा परिणाम आणि परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण यामुळे हा पाऊस झाल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. ढगाळ वातावरण असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण होते. त्यातच उकाडाही वाढला होता. त्यामुळे तुरळक भागात या पावसाने दमदार हजेरी लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उकाडा वाढला
शहरात कमाल तापमानाच्या पाऱ्यात अंशतः वाढ झाली आहे. त्यामुळे "ऑक्‍टोबर हीट'चा चटका शहरात पुन्हा एकदा जाणवू लागल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. किमान तापमानाचा पाराही 3.3 अंश सेल्सिअसने वाढून 21.4 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सध्या 32.3 अंश सेल्सिअस वर असलेला कमाल तापमानाचा पारा पुढील दोन दिवसांमध्ये 33 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

परतीचा मॉन्सून
ईशान्येकडील राज्यांसह आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, गोवा येथून मॉन्सून परतला आहे. देशाच्या उर्वरित भागातून पुढील काही दिवसांमध्ये हा परतीचा प्रवास पूर्ण करेल. महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पुढील दोन ते तीन दिवस हवामान कोरडे राहील, असा अंदाजही भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

Web Title: pune news rain