दोन दिवस पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पुणे - राज्यातील नैर्ऋत्य मोसमी पावसात मॉन्सून खंडला असून, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

पुणे - राज्यातील नैर्ऋत्य मोसमी पावसात मॉन्सून खंडला असून, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 8 जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे सुरवातीला कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे यापूर्वी काही दिवसांचा खंड पडला होता. त्यानंतर मॉन्सून पूर्ववत होत राज्यात बरसू लागला. विदर्भही त्याने व्यापला. मात्र, आता परत दुसरा खंड पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे, असे निरीक्षण हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी नोंदविले.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी गेल्या चोवीस तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडला. ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नगर, नाशिक, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. येत्या शुक्रवारपर्यंत (ता. 7) कोकणाचा दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

सध्या गुजरात ते केरळ यादरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती केरळकडून महाराष्ट्राकडे सरकत आहे. त्यामुळे कोकणात जोरदार पाऊस होत आहे; मात्र कर्नाटक, अरबी समुद्राकडून येणारे ढग कोकणातील डोंगरावर अडवले जातात. परिणामी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका पाऊस पडत आहे. पुणे परिसरातही अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Web Title: pune news rain chances in two days