पावसाने शहराला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

रस्त्यांवर पाण्याचे लोंढे, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

रस्त्यांवर पाण्याचे लोंढे, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
पुणे - ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने सायंकाळी पुणेकरांना झोडपले. रस्त्यांवरून वाहणारे पाण्याचे लोंढे, जागोजागी झालेली वाहतूक कोंडी आणि उपनगरांमध्ये सुरू असलेला विजेचा लपंडाव असे चित्र शहरात संध्याकाळी होते. रात्री साडेआठ वाजेपर्यंत 28.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी पारगाव खंडाळा, सातारा, शिरवळ, भोर या परिसरात पाऊस पडत असताना पुणे मात्र कोरडे होते. येथे ऊन पडले होते. त्यामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. अशातच संध्याकाळी सुरवातीला पाषाण, बालेवाडी, औंध या भागांत पावसाला सुरवात झाली. त्यानंतर त्याचा जोर वाढला.

शहराच्या मध्य वस्तीसह सातारा रस्ता, कोथरूड, सिंहगड रस्ता या भागांत पावसाला सुरवात झाली. तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली.

वीजपुरवठा खंडित
सहकारनगर येथील तुळशीबागवाले कॉलनी येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच शहराच्या मध्य वस्तीसह उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव सुरू होता. रात्री उशिरा काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.

सोळा दिवसांत 120 मिलिमीटर
शहरात 1 जूनपासून 120 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्यात झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी (ता. 12) दुपारी पडलेला पाऊस आणि त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये अधूनमधून पडलेल्या पावसाच्या सरी यामुळे पावसाची नोंद वाढत असल्याचे निरीक्षणही अधिकाऱ्यांनी नोंदविले.

पावसाचा अंदाज
17 जून - पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्‍यता.
18 जून - पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता.

Web Title: pune news rain in pune