बदलत्या काळाची पावले ओळखायला हवीत - निंबाळकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे - 'आमच्या काळचे शिक्षण निराळे होते. आत्ताच्या पिढीतल्या मुलांना करिअरसाठी अनेक विषय उपलब्ध आहेत. त्या अभ्यासक्रमांची नावेदेखील त्यांच्याकडूनच आपल्याला समजून घ्यावी लागतात. स्वायत्तता आणि खासगीकरणाची स्पर्धा वाढली आहे.

पुणे - 'आमच्या काळचे शिक्षण निराळे होते. आत्ताच्या पिढीतल्या मुलांना करिअरसाठी अनेक विषय उपलब्ध आहेत. त्या अभ्यासक्रमांची नावेदेखील त्यांच्याकडूनच आपल्याला समजून घ्यावी लागतात. स्वायत्तता आणि खासगीकरणाची स्पर्धा वाढली आहे.

त्यातूनच तरुण पिढीला करिअर निवडावे लागत असून, शिक्षण संस्थांनी बदलत्या काळाची पावले योग्य वेळी ओळखायला पाहिजेत,'' असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या "दि फर्ग्युसोनियन्स' या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. राम ताकवले, यशवंत मेहेंदळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे उपस्थित होते. निंबाळकर यांना "फर्ग्युसन गौरव' पुरस्काराने, तर मेजर जनरल माधुरी कानिटकर, अभिनेत्री सुहास जोशी, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी, लेखक अनिल अवचट यांना, तसेच आकांक्षा बुचडे, शिवानी इंगळे यांना "फर्ग्युसन अभिमान' पुरस्काराने गौरविण्यात आले.

निंबाळकर म्हणाले, 'फर्ग्युसनने देशाला, राज्याला अनेक नेते दिले. सध्याच्या विधानसभेत सर्वाधिक आमदार फर्ग्युसनचे विद्यार्थी आहेत. आमचे दिवस "हॅपी गो लकी' होते. त्या काळात स्पर्धाही फारशी नव्हती. ते दिवस चांगले होते.'' ताकवले म्हणाले, 'आधुनिकता, प्रगतिशीलता पुण्यातल्या महाविद्यालयांनी आणली. परदेशात जसे नोबेल विजेते होते, तसेच अनेक रॅंग्लर येथे होते. भविष्याच्या दृष्टीने आपल्याला डिजिटल सोसायटीचाच विचार अधिक करावा लागेल.''

सभापतिपदावर खूष
मला राजकारणाकडून फारसे काही मिळवायचे नाही. मंत्रिपदापेक्षा मला सभापतिपद चांगले वाटते. कारण सहजरीत्या "बस खाली, हो बाहेर' असे म्हणता येते. तो आनंद निराळाच. म्हणूनच मी सभापतिपदावर खूष आहे, असेही रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

Web Title: pune news ramraje naik nimbalkar