रांगोळीतून समाजप्रबोधन; समर्थ रंगावली ग्रुपचा अनोखा उपक्रम 

दीपेश सुराणा
मंगळवार, 20 जून 2017

"सामाजिक विषयांवर कमी वेळेत कलात्मक दृष्टिकोनातून रांगोळी काढली जाते. त्याचे विविध रंग वारकऱ्यांना मोहित करतात. त्यांच्याकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याने उत्साह दुणावतो. पालखी सोहळ्यात रांगोळीच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हा रंगावलीकारांना मिळत आहे. ही खूप अभिमानास्पद बाब आहे. पंढरपूर येथे गेल्या वर्षी काढलेल्या रांगोळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिशः कौतुक केले होते.'' 
- अक्षय घोळवे, रंगावलीकार. 

पिंपरी - चित्रकार आपल्या कुंचल्यातून चित्र रेखाटतो. कवी आपल्या प्रतिभेतुन उत्तम काव्य निर्मिती करतो. तर, रंगावलीकार आपल्या कल्पनेतून उत्कृष्ट रांगोळी काढतो. रांगोळी हे माध्यम वापरून समाजप्रबोधन होऊ शकते का? तर, होऊ शकते. समर्थ रंगावली ग्रुपमधील (पुणे) तरुणांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. गेल्या 16 वर्षांपासून ते आषाढी वारीच्या कालावधीत संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालत आहेत. 

"एड्‌स जनजागृती', "स्त्री भ्रूण हत्या', "बेटी बचाओ, बेटी पढाओ', "पाणी वाचवा', "प्लॅस्टिकचा वापर टाळा', "झाडे जगवा', "हुंडा बंदी', "नेत्रदान', "रक्तदान', "स्वच्छ भारत अभियान' अशा विविध समाजप्रबोधनपर विषयांना समर्थ रंगावली ग्रुपच्या तरुणांनी स्पर्श केला आहे. पालखी मार्गावर मुख्य चौक, मोठा रस्ता, पालखी विसावा, गावाचे प्रवेशद्वार, पालखी सोहळ्यातील विविध रिंगण आदी महत्त्वाच्या ठिकाणी रांगोळी काढून सेवा केली जाते. समर्थ रंगावली ग्रुपमधील तरुण हे डॉक्‍टर, अभियंता, व्यावसायिक आहेत. स्वतःची आवड आणि समाजप्रबोधन अशी दुहेरी सांगड त्यांनी घातली आहे. 
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सवांमध्ये ग्रुपचे रंगावलीकार स्वयंस्फूर्तीने रांगोळी काढतात. गालिचा रांगोळी, संस्कार भारतीची रांगोळी, पाण्यावरील व पाण्याखालील रांगोळी काढण्यात येते. 

समर्थ रंगावली ग्रुपचे सध्या 8 ते 40 वयोगटातील 21 सभासद आहेत. त्यामध्ये संतोष आढागळे, हेमंत जगताप, दिनेश ओझा, कुंदन तोडकर, अक्षय घोळवे, निखिल शिंदे, विकास नाईक, सतीश तोडकर, राहुल बुरांडे, स्मिता आढागळे, सविता पवार, पूनम बायस, सुनीता सोनार आदी प्रमुख रंगावलीकारांचा समावेश आहे. 

"सामाजिक विषयांवर कमी वेळेत कलात्मक दृष्टिकोनातून रांगोळी काढली जाते. त्याचे विविध रंग वारकऱ्यांना मोहित करतात. त्यांच्याकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याने उत्साह दुणावतो. पालखी सोहळ्यात रांगोळीच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हा रंगावलीकारांना मिळत आहे. ही खूप अभिमानास्पद बाब आहे. पंढरपूर येथे गेल्या वर्षी काढलेल्या रांगोळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिशः कौतुक केले होते.'' 
- अक्षय घोळवे, रंगावलीकार. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST​
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले​
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक​
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या​
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी

Web Title: Pune news rangoli pimpri-chinchwad