पुण्यातील रस्त्यांना नवा ‘लूक’

पुण्यातील रस्त्यांना नवा ‘लूक’

पुणे - तीन ते चार मीटर रुंदीचे पदपथ, दोन ते तीन मीटर रुंदीचे सायकल ट्रॅक, सेवा रस्ता आणि पादचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा... एरवी स्वप्नवत वाटणाऱ्या या घटकांना साकारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. औंधमधील डीपी रस्ता, जुना पुणे- मुंबई रस्त्यावर हे दृश्‍य साकारू लागले आहे. ‘रस्ता प्राधान्याने पादचाऱ्यांसाठी’ या संकल्पनेनुसार शहरी रस्त्यांची नवी बांधणी होऊ लागली आहे.

सातारा रस्त्याची पुनर्रचना
पादचाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होऊ शकेल आणि पर्यायाने प्रदूषणावरही नियंत्रण आणता येईल, यासाठी शहरी रस्ते मार्गदर्शक तत्त्वांनुसार शहरातील सुमारे २२५ किलोमीटर लांबीचे पदपथ रुंद करण्यास महापालिकेने नुकतीच सुरवात केली आहे. सातारा रस्त्याची पुनर्रचना करताना रुंद पदपथांबरोबरच सायकल ट्रॅक उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले असून, या कामाला नुकताच प्रारंभ झाला आहे.

औंधमधील डीपी रस्ता ‘मॉडेल’ 
स्मार्ट सिटीप्रकल्पांतर्गत औंधमधील डीपी रस्ता ‘मॉडेल’ करण्यात येत आहे. सुमारे दीड किलोमीटरच्या या रस्त्यावर ६ ते ८ मीटर रुंदीचा पदपथ, दोन मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक तर आहेच. परंतु, त्याचबरोबर मनमोहक लॅन्डस्केप, नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची सुविधाही करण्यात येत आहे. या पदपथावर अंधांसाठी विशेष प्रकारच्या टाइल्स बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे काठीच्या मदतीने चालताना पदपथ संपला, याची जाणीव त्यांना होईल, अशी माहिती पथ विभागातील कार्यकारी अभियंता युवराज देशमुख यांनी दिली. सुमारे दीड किलोमीटरच्या पदपथातील पहिल्या टप्प्याच्या ५०० मीटरच्या रस्त्याचे काम बहुतांशी पूर्ण झाले असून उर्वरित एक किलोमीटरच्या रस्त्याचे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे.

पदपथ दुतर्फा रुंद करणार
पुणे-मुंबई रस्त्यावर पाटील इस्टेट ते अंडी उबवणी केंद्र चौक दरम्यानच्या रस्त्यावर दोन ते चार मीटर रुंदीचे पदपथ, दोन मीटरचा सायकल ट्रॅक आहेच. त्या शिवाय सेवा रस्ता आणि वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा दिली आहे. पाटील इस्टेट ते हॅरिस पुलादरम्यानचा २.२ किलोमीटरचा रस्ता खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जातो. त्यामुळे तेथे पदपथ दुतर्फा रुंद करण्याचा आराखडा खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. त्यांनी मंजुरी दिल्यावर या रस्त्याचे काम सुरू होईल.

पदपथांचा आराखडा तयार
पाटील इस्टेट ते हॅरिस पुलादरम्यानचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल. या रस्त्यावरील कामाच्या पहिल्या टप्प्यात कोठेही वृक्षतोड करण्यात आलेली नाही. तर ६०-७० झाडे सामावून घेऊन पदपथांचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे, अशी माहिती युवराज देशमुख यांनी दिली. 

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पदपथ रुंद होत आहेत, ही चांगली बाब आहे. त्याचबरोबर सायकल ट्रॅकमध्ये सलगता आवश्‍यक आहे. अन्यथा त्यांचा उपयोग होणार नाही. उपनगरांमधील रस्त्यांबाबतही प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे. समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्याचा वेग वाढला पाहिजे.  
-नंदा लोणकर, नगरसेविका

वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी तसेच प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी रुंद पदपथ, सायकल ट्रॅक उपयुक्त ठरतील, यात शंका नाही. परंतु त्याचप्रमाणे प्रमुख रस्त्यांवर काही ठिकाणी रुंदीकरण करणे गरजेचे आहे. पदपथ रुंद करीत असतानाच रस्त्यांची रुंदी आणि लांबी वाढविणे गरजेचे आहे. सुरळीत वाहतुकीसाठी मुख्य रस्त्यांवरील अनेक ठिकाणची अतिक्रमणे हलविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे.
-उमेश गायकवाड, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com