आधारजोडणी नसल्याने अनेकांचे रेशन बंद !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

पुणे - अन्नधान्य वितरण विभागाकडून शहर आणि ग्रामीण भागातील रेशन कार्डाला आधारजोडणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे; परंतु अनेक रेशन कार्डधारकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे जोडणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना धान्य, रॉकेल आणि साखर मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. 

पुणे - अन्नधान्य वितरण विभागाकडून शहर आणि ग्रामीण भागातील रेशन कार्डाला आधारजोडणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे; परंतु अनेक रेशन कार्डधारकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे जोडणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना धान्य, रॉकेल आणि साखर मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. 

जिल्हा अन्नधान्य वितरण विभागाकडून शहर आणि जिल्ह्यातील सुमारे दोन हजार पाचशे स्वस्त धान्य वितरण दुकानांमधील केशरी, पिवळे आणि पांढरे रेशन कार्डाशी आधारजोडणी करणे बंधनकारक केले होते. या संदर्भात परिमंडलनिहाय कालबद्धकृती कार्यक्रम आखून दिला होता; परंतु काही कुटुंबप्रमुख नागरिकांनी अद्यापही आधार कार्डजोडणी न केल्यामुळे त्यांचे धान्य, रॉकेल आणि साखर वितरण बंद करण्यात आले आहे. ‘इलेक्‍ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल’ (ई-पॉस) मशिनद्वारे ‘बायोमेट्रिक’ (थंब इम्प्रेशन) घेऊन धान्य, रॉकेल आणि साखर वितरण करण्यात येणार असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ई-पॉस मशिनला आधारजोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या महिनाभरात सर्व दुकानांमध्ये ही सुविधा सुरू होणार असल्याचे अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या संदर्भात केशरी रेशन कार्डधारक असलेल्या मनीषा धारणे म्हणाल्या, ‘‘सहकारनगर येथील स्वस्त अन्नधान्य वितरण केंद्र महिला बचत गटाकडून चालविले जाते. दोन-तीन वेळा आधारजोडणीसाठी कागदपत्रे भरून देऊनसुद्धा धान्य, रॉकेल आणि साखर वितरण बंद करण्यात आले आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा करूनही काही फरक पडलेला नाही. आधारजोडणी नसल्याने धान्य दिले जात नसल्याचे दुकानदारांकडून सांगितले जाते. आम्ही दिलेली कागदपत्रे दुकानदारांनी गहाळ केली आहेत.’’

शहर आणि जिल्ह्यातील स्वस्त धान्य वितरण केंद्रांमधील रेशन कार्डांना आधारजोडणीचे काम ८० टक्के झालेले आहे. उर्वरित ज्या ग्राहकांनी आधार कार्ड काढलेले नाही, त्यांच्याकडून अद्याप रेशन बंद झाल्याची तक्रार आलेली नाही. त्याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.  
- शहाजी पवार, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी

Web Title: pune news ration close by aadhar card not connected