रेशन दुकानदारांची होणार तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पुणे - शहरातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य देणे बंधनकारक असतानाही स्वस्त धान्य दुकानदारांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे करणाऱ्या दुकानदारांची तपासणी करण्याच्या सूचना अखेर अन्नधान्य वितरण विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार मातोश्री आंबेडकर वस्तीसह (ताडीवाला रोड) शहराच्या विविध भागांतील नागरिकांनी केलेल्या तक्रारींनुसार आता परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक दुकानदारांची तपासणी करणार आहेत.

पुणे - शहरातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य देणे बंधनकारक असतानाही स्वस्त धान्य दुकानदारांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे करणाऱ्या दुकानदारांची तपासणी करण्याच्या सूचना अखेर अन्नधान्य वितरण विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार मातोश्री आंबेडकर वस्तीसह (ताडीवाला रोड) शहराच्या विविध भागांतील नागरिकांनी केलेल्या तक्रारींनुसार आता परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक दुकानदारांची तपासणी करणार आहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागांतील स्वस्त धान्य दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य दिले जात नसल्याच्या सद्यःस्थितीवर ‘सकाळ’ने ३० जुलै रोजी ‘रेशन’साठी फरफट’ या वृत्ताद्वारे प्रकाश टाकला होता. त्याबाबत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य न देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. 

अन्नधान्य वितरण विभागाने या प्रकाराबाबत खुलासा करत आत्तापर्यंत केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यामध्ये जुलै २०१७ मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत 

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी एकूण ४७२५ टन गहू व ३१५१ टन तांदूळ मंजूर करून या धान्याच्या वाटपाचे आदेश दिले होते. या योजनेनुसार जुलै २०१७ मध्ये धान्य मिळत नसल्याची शिधापत्रिकाधारकांची कुठलीही तक्रार आली नसल्याचा खुलासा कार्यालयाने केला आहे. 

याबरोबरच मातोश्री रमाबाई आंबेडकर वस्ती (ताडीवाला रोड), औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्ती, विश्रांतवाडी, येरवडा, धानोरी, कळस, दांडेकर पूल, जनता वसाहत, नांदेड फाटा, कात्रज, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर व मार्केट यार्ड या भागात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार संबंधित भागातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या तपासणीच्या सूचना परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षकांना दिल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

धान्यापासून कोणीही वंचित नाही
स्वस्त धान्य दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशिन्स बसविल्या आहेत. त्यामध्ये आधार बायोमेट्रिक पद्धतीने धान्याचे वाटप सुरू आहे. जुलै २०१७ मध्ये एकूण एक लाख २२ हजार ३५३ शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप ‘ई-पॉस’द्वारे केले आहे. आधार लिंक झालेले नाहीत अशा तसेच ‘ई-पॉस’मध्ये नाव नसलेल्यांनाही पूर्वीप्रमाणेच धान्यवाटप होत आहे. कोणत्याही पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित ठेवण्यात येत नसल्याचेही अन्नधान्य वितरण कार्यालयाने म्हटले आहे, तर ऑगस्ट महिन्यापासून ‘घरपोच वितरण व्यवस्था’ राबविण्यात आली आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

धान्यसाठ्याचे फलक लावण्याच्या सूचना
स्वस्त धान्य दुकानदारांकडून दुकानांच्या वेळा पाळल्या जात नाहीत, याबरोबरच उपलब्ध धान्यसाठ्याची माहिती फलकावर लावली जात नसल्याची सद्यःस्थिती ‘सकाळ’ने मांडली होती. त्यानुसार अन्नधान्य वितरण कार्यालयाने सर्व स्वस्त धान्य दुकानदार, पुरवठा निरीक्षक व परिमंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये सर्व दुकानांमध्ये प्राप्त धान्य, वाटप झालेले धान्य व शिल्लक धान्य, या स्वरूपाचे फलक तत्काळ लावावेत, याबरोबरच दुकान उघडण्याची व बंद करण्याची वेळ फलकावर द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.  

आधार क्रमांक देण्याचे आवाहन
शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील लाभार्थ्यांचे आधार क्रमांक स्वस्त धान्य दुकानदारांकडे द्यावेत. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना ‘ई-पॉस’द्वारे धान्य मिळू शकेल, असे आवाहन अन्नधान्य वितरण कार्यालयाने केले आहे. 

येथे करा तक्रारी
स्वस्त धान्य दुकानदारांविषयी शिधापत्रिकाधारकांची तक्रार असल्यास त्यांनी राज्य सरकारच्या e-Mahahfood.gov.in या संकेतस्थळावर किंवा १९६७/१८००-२२-४९५० या टोल फ्री क्रमांकावर किंवा helpline.mhpds@gov.in या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहनही कार्यालयाने केले आहे. 

तक्रारीसाठी क्रमांक
अंत्योदय अन्न योजनेमध्ये २१ किलो गहू व १४ किलो तांदूळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना परिमाणानुसार देण्यात येतो, तर अन्नसुरक्षा योजनेत तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ परिमाणानुसार प्रतिव्यक्तीस देण्यात येतो. तरी अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: pune news ration shop cheaking