शहा यांच्यावरील गोळीबार सीसीटीव्हीमध्ये कैद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर झालेला गोळीबार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेतील दोन हल्लेखोरांची नावे समोर आली असली तरी पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. पोलिस त्या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत. सुपारी देऊन हा खून केल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे - रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर झालेला गोळीबार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेतील दोन हल्लेखोरांची नावे समोर आली असली तरी पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. पोलिस त्या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत. सुपारी देऊन हा खून केल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

देवेन जयसुखलाल शहा (वय ५५) यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. मूळचे मुंबई येथील शहा गेल्या काही वर्षांपासून डेक्‍कनच्या प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक सातमधील सायली अपार्टमेंटमध्ये राहत होते. अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शहा यांच्यावर त्यांच्या मुलासमोर पाच गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 

डेक्‍कन पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यात दोन हल्लेखोर असून, त्यापैकी एक जण शहा यांच्यावर गोळ्या झाडत असल्याचे दिसून येत आहे. 

हल्लेखोर हे नवी पेठ भागातील असून, पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हल्लेखोरांची नावे समोर आली. मात्र, पोलिसांनी त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी डेक्‍कन पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना केली आहेत. जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. शहा यांचा मुलगा अतित शहा यांनाही यामागचे नेमके कारण सांगता आलेले नाही. 

डेक्‍कन पोलिसांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यात हल्लेखोर शहा यांच्यावर गोळ्या झाडताना दिसत आहेत. मात्र, हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय त्यांची नावे सांगता येणार नाहीत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत असून, लवकरच अटक करण्यात येईल.  
- डॉ. बसवराज तेली,  पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ एक 

Web Title: pune news Real Estate Business Deven Shah firing cctv footage