सोशल मीडियावर पाककलेचे धडे !

सुवर्णा चव्हाण
बुधवार, 7 जून 2017

‘फूड रेसिपी ॲप’द्वारे शिका विविध पदार्थ बनविण्याची कला 

‘फूड रेसिपी ॲप’द्वारे शिका विविध पदार्थ बनविण्याची कला 

पुणे - चिकन बिर्याणी कशी बनवतात, याची माहिती मिळवण्यासाठी वृषाली आता पाककलेच्या पुस्तकांवर अवलंबून राहत नाही, तर तिने नवीन पदार्थ शिकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. इटालियन असो वा अमेरिकन, इंडियन असो वा अरेबिक फूड ते कसे बनवावे याची संपूर्ण माहिती वेगवेगळ्या ‘फूड रेसिपी ॲप’मधून मिळवता येत आहे. त्यामुळे अशा ॲप्लिकेशनचा वापर सध्या महिला-तरुणींकडून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर फेसबुक पेजच्या माध्यमातून पाककलातज्ज्ञांकडून शेअर केल्या जाणाऱ्या दररोजच्या रेसिपीजच्याही महिला-तरुणी फॉलोअर्स बनल्या आहेत.  

वेगवेगळ्या ॲप व फेसबुक पेज बरोबरच पाककलातज्ज्ञांची संकेतस्थळ, व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारेही महिला-तरुणींना नवनव्या फूड रेसिपी अगदी सहजपणे जाणून घेता येत आहेत. हा ट्रेंड गेल्या तीन वर्षांपासून वाढला असून, आता कोणतीही रेसिपी महिला-तरुणींना घरबसल्या तयार करता येत आहे.  

याबाबत प्रगती संकुडे म्हणाल्या,‘‘मला नवीन पाककला जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे मी फेसबुक पेज आणि वेगवेगळ्या साइट्‌स नेहमीच सर्च करत असते. मी इंडियन फूड रेसिपीजच्या विविध ॲप्लिकेशनचाही वापर करते. पाककलेचे जाणून घेण्याचे हे नवे माध्यम खूपच प्रभावी आहे. विविध देशातील फूड रेसिपी या माध्यमातून जाणून घेता येतात आणि त्याची पाककृतीही अगदी सहजपणे कळते. मुलांसाठीच्या डब्याच्या हेल्दी रेसिपीजही यातून जाणून घेता येतात.’’

फूड रेसिपी जाणून घेण्यासाठी फेसबुक पेजचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले शेफ आणि पाककलातज्ज्ञ रोज फेसबुक पेज नवनवीन रेसिपीची पाककृती शेअर करतात. ते कसे बनवतात, त्यासाठी कोणते मसाले वापरावे, त्याची कृती आणि पदार्थ तयार झाल्यानंतर त्याचे प्रेझेंटेशन कसे करावे, अशा विविध गोष्टींची माहिती फेसबुक पेजवर पाककलातज्ज्ञ देत आहेत. 

व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून पाककृती महिला-तरुणींपर्यंत पोचविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पाककलातज्ज्ञ आणि शेफ यांनी सुरू केलेल्या पेजला महिला-तरुणी फॉलो करत आहेत. पाककला कशी तयार करायची याबाबत जाणवणाऱ्या महिला-तरुणींच्या शंकांना ते थेट उत्तरे देत आहेत.

पाककला जाणून घेण्यासाठी व्हॉट्‌सॲप
महिला-तरुणींनी नवनवीन पाककला जाणून घेण्यासाठी आणि आपल्या पाककला मैत्रिणींशी शेअर करण्यासाठी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपद्वारे महिला-तरुणींना आपल्या रेसिपी शेअर करता येत असून, नवनवीन पदार्थ कसे तयार करायचे याबाबतची चर्चा या ग्रुपमध्ये चालते. 

पाककलेची पुस्तकेही ऑनलाइन उपलब्ध
अमेरिकन फूड, इंडियन फूड अशा विविध फूड रेसिपीची पुस्तके आता ऑनलाइनही उपलब्ध आहेत. पाककलातज्ज्ञांची ही पुस्तके ई-बुकच्या माध्यमातून महिला-तरुणींसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या पाककला जाणून घेण्यासाठी या ई-बुकचाही महिला-तरुणीकडून वापर वाढला आहे. विविध देशातील फूड रेसिपीजचा समावेश असलेल्या ही पुस्तके ई-बुकद्वारे महिला-तरुणींपर्यंत पोचत आहेत.

Web Title: pune news recipe learning on social media