वन्यप्राणी पुनर्वसनाची ‘हॉटलाइन’ होणार खुली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

पुणे - विहिरीत बिबट्या पडला...घरात साप आढळला... रस्ता ओलांडताना जखमी झालेले हरिण दिसले की लगेच वन अधिकाऱ्यांना फोन लावला जातो. त्यानंतर वन अधिकारी वन्यप्राणी पुनर्वसन (रेस्क्‍यू) टीमसह घटनास्थळी दाखल होतात आणि अवघ्या काही तासांमध्ये ‘रेस्क्‍यू ऑपरेशन’ फत्ते करतात. हे साध्य होते ते वन अधिकारी आणि पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये असणाऱ्या ‘हॉटलाइन’मुळे. आता हीच ‘हॉट लाइन’ नागरिकांसाठीही खुली होणार आहे.

वन्यप्राणी संवर्धन आणि पुनर्वसनासाठी ‘वाइल्ड लाइफ एसओएस’ ही स्वयंसेवी संस्था देशातील विविध वनक्षेत्रात वन्यप्राणी आणि पक्षांच्या पुनर्वसनासाठी वन विभागाच्या सहकार्याने काम करते. संस्थेची देशभरात दहा केंद्रे असून महाराष्ट्रातील केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील माणिकडोह बिबट्या पुनर्वसन केंद्रातून संस्थेचे स्वयंसेवक आणि पशुवैद्यकीय अधिकारी काम पाहतात. 

वन्यप्राण्यांसाठी चोवीस तास सेवा देण्यात वन अधिकाऱ्यांसमवेत या संस्थेचे कार्यकर्ते सज्ज असतात. या संस्थेची देशपातळीवर चोवीस तास कार्यान्वित असणारी ‘हॉट लाइन’ आहे. सध्या दिल्ली आणि आग्रा परिसरात या ‘हॉट लाइन’द्वारे सर्वसामान्य नागरिकांनाही ‘रेस्क्‍यू टीम’शी संपर्क साधणे शक्‍य होत आहे. याच ‘हॉटलाइन’द्वारे पुण्यातही संपर्क केला जाऊ शकतो. यापूर्वी ही ‘हॉटलाइन’अंतर्गत वापरासाठी होती, आता ती सर्वसामान्य नागरिकांनाही वापरता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सर्वसामान्य नागरिक ‘हॅलो फॉरेस्ट’ या टोल फ्री क्रमांकाद्वारे वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात. त्यानंतर वन अधिकारी आणि वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी ‘हॉटलाइन’द्वारे संपर्क करण्यात येतो. ‘वाइल्ड लाइफ एसओएस’ संस्था वन्यप्राण्यांच्या वन विभागाच्या मदतीने स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याच्या विचारात आहे.
- डॉ. अजय देशमुख, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी 

Web Title: pune news Rehabilitation 'Hotline' will be open