'रिलायन्स जिओ'ची खोदाई थांबवा - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पुणे - 'रिलायन्स जिओकडून सुरू असलेल्या खोदाईबाबत महापालिकेकडे आलेल्या तक्रारींची दखल पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली आहे. या कंपनीची चौकशी करून खोदाईचे काम थांबवावे,'' असा आदेश बापट यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सोमवारी दिला.

पुणे - 'रिलायन्स जिओकडून सुरू असलेल्या खोदाईबाबत महापालिकेकडे आलेल्या तक्रारींची दखल पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली आहे. या कंपनीची चौकशी करून खोदाईचे काम थांबवावे,'' असा आदेश बापट यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सोमवारी दिला.

रिलायन्स जिओ कंपनीला महापालिकेने शहरातील विविध रस्त्यांवर 153 किलोमीटर खोदाई करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ही खोदाई करताना महापालिकेबरोबर झालेल्या कराराचे उल्लंघन होत असल्याचे निवेदन नगरसेवक उमेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना नुकतेच दिले आहे. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली आहे.

रिलायन्स जिओला खोदाईसाठी मुदतवाढ देताना महापालिकेने आवश्‍यक ते शुल्क घेतले नाही. महापालिकेचे काही अधिकारी "रिलायन्स'शी संबंधित आहेत. त्यामुळे त्या कंपनीला अनावश्‍यक सवलती दिल्या जात आहेत. रिलायन्सकडे थकबाकी असतानाही त्यांना सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर बापट यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सोमवारी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की रिलायन्सच्या खोदाईबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याची पडताळणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे काम तातडीने थांबवून चौकशी करण्याची गरज आहे. त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. दरम्यान, महापालिकेच्या पथविभागाने याबाबत माहिती संकलित करण्यास प्रारंभ केल्याचे समजते.

Web Title: pune news reliance jio digging girish bapat