
IPS Vijay Raman passed away : निवृत्त आयपीएस अधिकारी विजय रमण यांचे निधन
पुणे : चंबळ खोऱ्यातील डाकू पानसिंग तोमर याला पोलिस चकमकीत ठार मारणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे मध्य प्रदेश केडरचे निवृत्त आयपीएस अधिकारी विजय रमण यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
रमण हे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या १९७५ च्या तुकडीतील अधिकारी होते. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक असताना त्यांनी १९८१ मध्ये तोमरविरुद्ध १४ तास चाललेल्या चकमकीचे नेतृत्व केले होते. रमण यांचा अनेक दहशतवादविरोधी आणि नक्षलविरोधी अभियानात सहभाग होता.
त्यांनी मध्यप्रदेश पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांसह विविध आस्थापनांमध्ये काम केले. त्यांनी १९८४ मध्ये भोपाळ वायू दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना वाचविण्यात आणि पुनर्वसन करण्यात सक्रिय भूमिका बजावली. फूलन देवी आणि मलखान सिंग या डाकूंच्या आत्मसमर्पणातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. रमण यांना यावर्षी फेब्रुवारीमध्ये कर्करोग झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.