रिक्षा परवाना वेबसाइटमधील घोळ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पुणे - ऑनलाइन पद्धतीने रिक्षा परवाना वाटपासाठी "एनआयसी'ने तयार केलेल्या वेबसाइटमधील घोळ मिटण्यास तयार नाही. परवान्यासाठी अर्ज केलेल्या काही रिक्षाचालकांना कागदपत्रांच्या छाननीसाठी थेट पुढच्या वर्षीची, तर एका रिक्षाचालकाला तब्बल तीन वर्षांनंतरची म्हणजे ऑगस्ट 2020 ची अपॉइंटमेंट मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - ऑनलाइन पद्धतीने रिक्षा परवाना वाटपासाठी "एनआयसी'ने तयार केलेल्या वेबसाइटमधील घोळ मिटण्यास तयार नाही. परवान्यासाठी अर्ज केलेल्या काही रिक्षाचालकांना कागदपत्रांच्या छाननीसाठी थेट पुढच्या वर्षीची, तर एका रिक्षाचालकाला तब्बल तीन वर्षांनंतरची म्हणजे ऑगस्ट 2020 ची अपॉइंटमेंट मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यामुळे गडबडलेल्या रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयाकडे धाव घेतल्यानंतर वेबसाइटमध्ये बिघाड झाल्यामुळे अपॉइंटमेंटच्या तारखांमध्ये चूक होत असल्याची माहिती समोर आली आहे.
रिक्षा परवान्यासाठी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने ऑनलाइन अर्ज केले आहेत. अर्ज आणि कागदपत्रांची छाननी करण्यासाठी अर्जदाराला अर्ज भरल्यानंतर लगेचच अपॉइंटमेंटची तारीख सांगितली जाते. त्या तारखेला अर्जदारांना आरटीओ कार्यालयात उपस्थित राहून संबंधित सर्व कागदपत्रे जमा करावी लागतात. मात्र, वेबसाइटमध्ये पुन्हा बिघाड झाल्यामुळे अपॉइंटमेंटच्या तारखांमध्येही घोळ होऊ लागला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या वेबसाइटमधील तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर आता अपॉइंटमेंटच्या तारखांचा घोळ सुरू झाला आहे. एका रिक्षाचालकाला ऑगस्ट 2020, तर दुसऱ्याला फेब्रुवारी 2019 ची अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. तसेच, एकाला ऑगस्ट 2018 ची अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा परवान्यासाठी दीड वर्षे वाट पाहावी लागणार आहे का, असा प्रश्‍न या रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे.

चुकांची तातडीने दुरुस्ती
वेबसाइटमध्ये बिघाड झाल्याने अपॉइंटमेंटच्या तारखांमध्ये चुका होत आहेत. आतापर्यंत 11 हजार नागरिकांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. या उमेदवारांना नोव्हेंबर 2017 पर्यंतच्या अपॉइंटमेंट दिल्या गेल्या आहेत. वेबसाइटमधील बिघाडामुळे काही अर्जदारांना चुकीच्या तारखा दिल्या गेल्या असण्याची शक्‍यता आहे. याबाबत एनआयसीशी चर्चा करून हा बिघाड त्वरित दुरुस्त केला जाईल. तसेच, संबंधित अर्जदारांना पुन्हा अपॉइंटमेंट दिली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी सांगितले.

Web Title: pune news rickshaw permit website confussion

टॅग्स