वडील-मुलाचे नाते उलगडणारा "रिंगण'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017


चित्रपटांतून आजवर समस्या मांडल्या जात, पण "रिंगण' एक पाऊल पुढे जात उपाय सुचवू पाहतोय. शिवाय, वडील-मुलाच्या नात्याचे तरल चित्रणदेखील यात पाहायला मिळेल. जगण्यावरची निष्ठा वाढीस लावणारा आणि माणसातला चांगुलपणा दाखवणारा हा चित्रपट आहे.
- शशांक शेंडे, अभिनेते

पुणे: "वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर काही मांडू पाहणारा सिनेमा म्हणजे "रिंगण' आहे. या नात्याच्या सोबतीनेच शेतकऱ्यांचे जगणे, दुष्काळी परिस्थिती आणि सावकारी पाश आदी गोष्टींची किनारही या चित्रपटाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, वडील आणि मुलगा यांचा आपापला शोध घेणारा एक स्वतंत्र प्रवासही यात पाहायला मिळतो,'' अशा शब्दांत "रिंगण'चे लेखक-दिग्दर्शक मकरंद माने यांनी मत व्यक्त केले.
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेला आणि राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटविलेला रिंगण चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने या चित्रपटाच्या टीमने "सकाळ' कार्यालयास भेट दिली. माने यांच्यासह अभिनेते शशांक शेंडे आणि बालकलाकार साहिल जोशी उपस्थित होते.

माने म्हणाले, ""रोजच्या जगण्याच्या धडपडीवर चित्रपटातून मांडणी करणे एक आव्हानच होते. एक साधीसोपी मांडणी हीच "रिंगण'मधून खूप काही सांगून जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मांडणी वास्तवदर्शी आहे. प्रेक्षक त्याच्याशी नक्कीच जोडले जाऊ शकतील.''

आपल्या भूमिकेविषयी बोलताना शेंडे म्हणाले, ""जीवनातल्या सकारात्मकतेवर बोलणारा हा चित्रपट आहे. माझी भूमिका एकीकडे आव्हानात्मक आणि दुसरीकडे मला स्वतःला खूप आनंद देऊन जाणारी, नवं काही शिकवून जाणारी होती.''

साहिल म्हणाला, ""हा माझा पहिलाच चित्रपट. ही भूमिका करताना मला खूप काही शिकायला मिळाले. अतिशय वेगळा अनुभव होता. महत्त्वाचे म्हणजे आमच्या संपूर्ण टीमने मला सांभाळून घेत शूटिंग केले.''

Web Title: pune news ringan marathi movie