शहरात रस्त्यांची खोदाई सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - पावसाळ्याच्या तोंडावर शहर आणि उपनगरांमध्ये खासगी कंपन्यांकडून रस्त्यांची खोदाई सर्रास सुरू आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या आदेशाकडे खासगी कंपन्या काणाडोळा करत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर 31 मे पर्यंत खोदाई थांबविण्याचा प्रशासनाचा दावा पूर्णपणे फोल ठरल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. परिणामी, ऐन पावसाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आव्हान महापालिकेला पेलावे लागणार आहे. 

पुणे - पावसाळ्याच्या तोंडावर शहर आणि उपनगरांमध्ये खासगी कंपन्यांकडून रस्त्यांची खोदाई सर्रास सुरू आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या आदेशाकडे खासगी कंपन्या काणाडोळा करत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर 31 मे पर्यंत खोदाई थांबविण्याचा प्रशासनाचा दावा पूर्णपणे फोल ठरल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. परिणामी, ऐन पावसाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आव्हान महापालिकेला पेलावे लागणार आहे. 

महापालिका प्रशासनाने खोदाई करणाऱ्या कंपन्यांना साधी नोटिसाही बजाविल्या नाहीत. त्यामुळे या कंपन्यांना कोणाचेही भय राहिलेले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विविध सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांना यंदा सुमारे साडेचारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई करण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. मात्र 31 मेपर्यंत ही कामे संपविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत; परंतु खोदाईचे कामे वेळेत झाले नसल्याने मुदतीनंतरही ते सुरूच आहे. 

वर्दळीच्या गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुशोभीकरणाची कामे सुरू असल्याने येथील खोदाई सुरू आहे; तसेच औंध येथील ब्रेमन चौक ते परिहार चौकादरम्यान दोन्ही बाजूंचा रस्ता बंद करून खोदाई सुरू आहे. विशेष म्हणजे कंपन्यांना खोदाई बंदचा आदेश देणाऱ्या महापालिकेचे हे काम हाती घेतले आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ही कामे सुरू असल्याने नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. या भागात सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

जंगली महाराज रस्त्याच्या परिसरातही खोदाई होत असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. पुणे-सातारा रस्त्याच्या परिसरातही खोदाईचे काम अजूनही सुरू आहे. नगर रस्त्यावरील फुलेनगर, विश्रांतवाडी, धानोरी, कळस परिसरातील रस्त्यांची खोदाई होत आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात म्हणजे, ऐन पावसाळ्यात या भागात नागरिकांचे हाल होण्याची भीती आहे. 

पावसाळ्याच्या तोंडावर खोदाईची कामे थांबविण्यात येतात. त्यानुसार यंदा 31 मेपर्यंत ही कामे थांबली आहेत. सध्या काही ठिकाणी खोदाई होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. 
-राजेंद्र राऊत, प्रमुख, पथविभाग, महापालिका. 

आजपर्यंत होणार दुरुस्ती 
शहरात गेल्या काही महिन्यांत शहरात ज्या रस्त्यांची खोदाई झाली त्यांची दुरुस्ती सोमवारपर्यंत (ता.5) करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पथविभागाने स्पष्ट केले आहे. मात्र अजूनही काही भागात खोदाई सुरू असल्याने रस्ते पूर्ववत करणे शक्‍य नसल्याचे परिस्थितीवरून दिसून येते; तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. बहुतेक भागातील कामे पूर्ण करण्यात आल्याचेही महापालिका प्रशासनाने सांगितले.

Web Title: pune news Road digging