पुणेः सविंदणे येथे शस्त्राचा धाक दाखवून दरोडा

युनूस तांबोळी
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील पोकळे वस्तीवर पहाटे सहा चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चार घरात लूट केली. जेष्ठ महिला सुलाबाई सुखदेव वाईकर (वय 60) यांना चोरट्यांनी मारहाण केल्याने त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केला आहे. दरोडेखोरांनी एकून 1 लाख 23 हजार 700 रूपयांचे सोने चांदी व रोख रक्कम लुटून चोरटे पसार झाले. शिरूर पोलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीसरात नागरीकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे.

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील पोकळे वस्तीवर पहाटे सहा चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चार घरात लूट केली. जेष्ठ महिला सुलाबाई सुखदेव वाईकर (वय 60) यांना चोरट्यांनी मारहाण केल्याने त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केला आहे. दरोडेखोरांनी एकून 1 लाख 23 हजार 700 रूपयांचे सोने चांदी व रोख रक्कम लुटून चोरटे पसार झाले. शिरूर पोलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीसरात नागरीकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादीचा मुलगा सुरेश वायकर तळेगाव ढमढेरे येथे पत्नीसह राहण्यास आहे. त्यामुळे फिर्यादी एकटीच येथील वस्तीवर राहते. वायकर या शुक्रवारी (ता. 15) रात्री जेवण करून घरासमोरील लोखंडी बाजेवर झोपली होती. पहाटे तीनच्या सुमारास सहा अज्ञात व्यक्ती तिच्या बाजेजवळ उभे होते. त्यापैकी तीन अज्ञात व्यक्तींच्या हातात लाकडी दांडके, एकाच्या हातात लोखंडी गज, एकाच्या हातात कुऱ्हाड, एकाच्या हातात तलवार होती. त्यांचे वय अंदाजे 30 ते 35 वयोगटातील काही अंगाने सडपातळ तर काही जाडजूड असे सहा जण होते. कुऱ्हाड असणाऱ्या व्यक्तीने फिर्यादीच्या कंबरेला खोचलेली पिशवी काढली. त्यातील चावी काढून दरवाजा उघडला. इतर चार जणांनी लोखंडी बाजेसह फिर्यादीला घरामध्ये नेले. त्यानंतर हातात दांडके असणारे दोघेजण बाहेर थांबले. हातात गज असणाऱ्या व्यक्तीने फिर्यादीला तुझ्याकडे काय आहे ते आम्हाला दे... असे म्हणाला.

माझ्याकडे काही नाही म्हटल्यावर त्यांनी फिर्यादीला लोखंडी गजाने पाठीवर, खांद्यावर मारले. ओरडू नको नाहीतर मारून टाकीन. त्यांच्या हातातील शस्त्रे पाहून ही जेष्ठ महिला पुर्ण घाबरून गेली होती. त्यानंतर एकाने तिच्या कानातील कुड्या व गळ्यातील सोन्याचा गंठण काढून घेतले. घरातील सामानांची उचकापाचक करून डब्यातील 4 हजार रूपये काढून घेतले. फिर्यादीला घरामध्ये कोंडून बाहेरून कडी लावली. चोरटे निघून गेल्याची खात्री झाल्यावर फिर्यादीने मोठमोठ्याने आरडा ओरडा केल्यावर शेजारील रविंद्र पोकळे व भाऊ पोकळे धावून आले. त्यांनी घराची बाहेरून कडी काढून सुटका केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच वस्तीवरील दत्तात्रेय चंदू कदम, रामदास सुदाम पडवळ यांच्या घरी देखील दमदाटी करून चोरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. फुलाबाई सुखदेव वाईकर यांचे 4 हजार रोख रक्कम, अर्धा तोळ्याचे मनीमंगळसुत्र, एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कुड्या, दत्तात्रेय चंदू कदम यांच्या येथून रोख रक्कम 7 हजार तीनशे रूपये, दीड तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्याचे मणी, दोन सोन्याच्या वाट्या, चार ग्रॅम वजनाच्या कानातील दोन कुड्या, अर्ध्या तोळ्याचे शिंपले व मणी असलेले मंगळसूत्र, अर्ध्या तोळ्याचे कानातील सोन्याचे वेल तर रामदास सुदाम पडवळ यांचे अर्ध्या तोळ्याचे मणी मंगळसूत्र व वाट्या, चांदीच्या पाच भार वजनाच्या पट्टया, पाच भार वजनाचे जोडवी, चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कुड्या असे असे एकून 1 लाख 23 हजार 700 रूपयांचे सोने, चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. पांडूरंग विठोबा मेचे यांच्या घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथे चोरांना काही हाती लागले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे व पोलिस उपनिरीक्षक किरण धोंगडे यांनी भेट देऊन दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी शस्त्राचा धाक दाखवून लुट करण्याचा प्रकार भितीदायक असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितला. टाकळी हाजी पोलिस चौकीस पोलिस कर्मचारी नसल्याने ही पोलिस चौकी नेहमीच बंद पहावयास मिळते. दरम्यान, या भागात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरीक करू लागले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे करीत आहेत.

Web Title: pune news robbery in shirur taluka