घर दूर असल्याने नाकारला प्रवेश!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

ऑनलाइन अर्ज भरताना मुलांच्या नावात, आडनावात झालेल्या चुका गृहीत धरून शाळांना कोणाचाही प्रवेश अडविता येणार नाही. पालकांनी सादर केलेला उत्पन्नाचा दाखला तपासण्याचा अधिकार शाळांना नाही. त्यांनी तो तहसीलदारांकडून पडताळून घ्यावा. बनावट असल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्याच्या सूचना शासन निर्णयात आहेत. त्यामुळे किरकोळ कारणावरून शाळांनी प्रवेश नाकारू नयेत.
- शरद गोसावी, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक

पुणे - ‘‘शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी लॉटरीमधून पाल्याला शाळा मिळाली; पण शाळा प्रवेश देत नाही. रहिवासाचा पत्ता शाळेपासून एक किलोमीटरपेक्षा दूर असल्याचे सांगितले जाते,’’ अशा तक्रारी घेऊन पालक प्राथमिक शिक्षण संचालनालयामध्ये हेलपाटे मारू लागले आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असता, अशा तक्रारी येऊ लागल्याचे त्यांनी मान्य केले. याबाबत ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे आलेल्या आठ-दहा तक्रारींपैकी काहींची आम्ही शहानिशा करून घेतली आहे. या प्रकरणांमध्ये पालकांनी अपेक्षित शाळा मिळण्यासाठी अर्ज भरताना चूक केली आहे. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरताना पालकांनी निवासाच्या पत्त्याचे ठिकाण निश्‍चित करताना गुगल मॅपवरील बलून आपल्या निवासाच्या भागाजवळ न्यायचा असतो.’’

पालकांनी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर बलून ठेवून पत्ता निश्‍चित केला आहे. त्यांच्या पाल्यांना जवळची शाळादेखील मिळाली. मात्र शाळेने पत्त्याचे ठिकाण तपासले असता, ते शाळेपासून दोन, अडीच, तीन किलोमीटर अंतरावर दिसून आल्याने प्रवेश नाकारण्यात येत आहे. पालकांनी जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत. तरीही त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.

योग्य तक्रारींची दखल
‘‘पालकांनी केलेल्या तक्रारींबाबत गटशिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांना सुनावणी घेण्याची सूचना केली आहे. काही प्रकरणांमध्ये पालकांच्या पत्त्यापासून शाळेचे अंतर खरेच एक किलोमीटर असेल, तर त्याचा निश्‍चितपणे विचार केला जाईल. परंतु ज्यांना आधीच्या सोडतीमध्ये प्रवेशासाठी शाळा मिळाल्या आहेत, त्यांना पुढील फेरीत भाग घेता येणार नाही,’’ असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news rte school admission