"आरटीओ'त दिव्यांगांसाठी व्हीलचेअर रॅम्प 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

पुणे - दिव्यांग व्यक्तींना आता कोणत्याही आणि कोणाच्याही मदतीशिवाय पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील (आरटीओ) कामे करता येणे शक्‍य होणार आहे. केंद्र सरकारच्या "सुगम्य भारत' योजनेअंतर्गत येथे दिव्यांगांसाठी व्हीलचेअर रॅम्प तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि दृष्टिहीन व्यक्तींसाठी विशेष टाइल्स बसविण्याचे काम सुरू आहे. 

केंद्र सरकारच्या अपंग कल्याण मंत्रालयाद्वारे देशात "सुगम्य भारत' योजना राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात ही योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविली जात आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अभियंत्यांची नेमणूक केली होती. या अभियंत्यांनी जिल्ह्यातील कोणत्या कार्यालयामध्ये दिव्यांगांसाठी कोणत्या सोयीसुविधा देणे आवश्‍यक आहे, याचा प्रस्ताव तयार करून समाजकल्याण विभागाला दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील 35 सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी 30 कोटी रुपये खर्च करून विविध विकासकामे करणार आहे. यामध्ये सर्वप्रथम पुणे आरटीओ कार्यालयात दिव्यांगांसाठी व्हीलचेअर रॅम्प, स्वच्छतागृह आणि दृष्टीहिनांसाठी टाइल्स बसविण्याच्या कामास सुरवात केली आहे. तळमजल्यापासून ते पहिल्या मजल्यापर्यंत रॅम्प तयार करणार आहे. त्यानंतर कार्यालयाच्या मागील बाजूस स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे. तसेच दृष्टिहीन व्यक्तींना कार्यालयात सहज फिरता यावे, यासाठी स्पर्शाने अनुभवता येईल अशा प्रकारच्या टाइल्स बसविण्याचे काम सुरू आहे. या टाइल्स पहिल्या मजल्यावरील प्रत्येक भिंतीवर बसविणार असून, त्यासाठी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून ही सर्व कामे 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आरटीओने ठेवले आहे. 

दिव्यांगांसाठी लिफ्ट 
आरटीओ कार्यालयात या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात व्हीलचेअर रॅम्प, स्वच्छतागृह आणि टाइल्स बसविण्याचे काम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दिव्यांगांसाठी लिफ्ट बसविणार आहे. त्यासाठी "आरटीओ'च्या इमारतीत आणखी एक मजला बांधणार आहे. तसा प्रस्ताव आरटीओने राज्य सरकारकडे पाठविला आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी सांगितले.

Web Title: pune news RTO handicap Wheelchair Ramp